निवडून आल्यास दुकानदार बनतात

निवडून आल्यास दुकानदार बनतात

पुणे - "निवडणुका आल्या की "फेरीवाले' आणि निवडून आले की दुकानदार,' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर टीका केली. निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडून तिकीट मिळण्याची स्वप्न बघण्यापूर्वी आपल्या प्रभागासाठी काय काम करणार, याचा विचार करा, असा सल्लासुद्धा राज यांनी इच्छूक उमेदवारांना या वेळी दिला.

मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता. बाळा नांदगावकर, राजन शिरोडकर, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, हेमंत संभूस, अजय शिंदे, किशोर शिंदे, गणेश सातपुते, रूपाली पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, नगरसेवक आणि कार्यकर्ते मेळाव्यासाठी उपस्थित होते.

राज म्हणाले, ""निवडणुका आल्यावर अनेकजण रात्री झोपेत एकटेच बडबडतात. तिकीट मिळण्याची स्वप्न पडणाऱ्यांना त्यांच्या भागाच्या विकासाची स्वप्न नाही पडत. निवडणुका आल्या की ते "फेरीवाले' बनतात. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी "फूटपाथ' बदलणारे हे पक्षबदलू निवडून आले की दुकानदारी करतात. आपण निवडणूक कशासाठी लढवतो आहोत, आपल्या प्रभागात काय करणार आहोत, याची स्वप्ने कोणी पाहात नाही. असली फालतू व फुकटची स्वप्ने मनसेच्या कार्यकर्त्यांनी बघू नयेत. अन्य लोकांची रेष छोटी करण्यापेक्षा स्वतःची रेष मोठी करा. आपल्या प्रभागाच्या विकासकामांची आखणी करा.''

पाक कलाकारांवर कायमची बंदी आणू शकतो
""पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय सिनेमात बंदी घालण्याच्या मागणीचा आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही. चित्रपटांचे चित्रीकरण दोन वर्षांपूर्वी सुरू झाले त्या वेळीही मनसेने त्यांना विरोधच केला होता. निर्मात्यांनी लष्कराला पाच कोटी रुपये देण्याच्या मुद्‌द्‌यावर झालेली टीका अनाठायी आहे. ज्यांच्या हाताला यश लागले नाही त्यांनी "सैनिकांसाठी पाच आणि स्वतःसाठी पाच,'' अशा गोष्टी पसरविण्यास सुरवात केली; पण भिकारड्यांकडून विकला जाणारा राज ठाकरे नाही. निवडणूक न लढवतासुद्धा पाकिस्तानी कलाकारांवर मी बंदी आणू शकतो. कारण माझी खरी ताकद रस्त्यावर आहे कार्यकर्त्यांच्या रूपात,'' असेही राज यांनी या वेळी सांगितले.

सर्वाधिक स्थलांतर ठाणे व पुण्यात
""देशातील सर्व राज्यांमधून होणारे सर्वाधिक स्थलांतर हे ठाणे व पुणे जिल्ह्यात होत आहे. शिक्षणाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या दोन लाख विद्यार्थ्यांपैकी 80 हजार विद्यार्थी कायमस्वरूपी पुण्यात वास्तव्य करत आहेत. बेशिस्तपणे वाढणाऱ्या शहरांकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही,'' अशी टीकासुद्धा राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com