मॉडर्न महाविद्यालयाला "ए प्लस' दर्जा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेने (नॅक) तिसऱ्या फेरीत केलेल्या देशातील 24 महाविद्यालयांच्या मूल्यांकनात राज्यातील तीन महाविद्यालयांना "ए प्लस' दर्जा मिळाला आहे. त्यात शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचा समावेश आहे. कर्वेनगर येथील सिद्धिविनायक महाविद्यालयास "ए' दर्जा मिळाला आहे.

पुणे - राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेने (नॅक) तिसऱ्या फेरीत केलेल्या देशातील 24 महाविद्यालयांच्या मूल्यांकनात राज्यातील तीन महाविद्यालयांना "ए प्लस' दर्जा मिळाला आहे. त्यात शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचा समावेश आहे. कर्वेनगर येथील सिद्धिविनायक महाविद्यालयास "ए' दर्जा मिळाला आहे.

"नॅक'ने तीनही फेऱ्यांचा मूल्यांकन दर्जा जाहीर केला आहे. दर पाच वर्षांनी विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे मूल्यांकन केले जाते. या वेळी तिसऱ्या फेरीत महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांना ए प्लस आणि आठ महाविद्यालयांना ए श्रेणी मिळाली आहे. ए प्लस श्रेणी मिळालेल्या अन्य महाविद्यालयांत परभणीतील शिवाजी महाविद्यालय आणि बीडमधील बलभीम कला, वाणिज्य महाविद्यालयाचा समावेश आहे.

सिद्धिविनायक महाविद्यालयाबरोबरच मुंबईतील सर्वंकष शिक्षणशास्त्र, डोंबिवलीतील पेंढारकर, सोलापूरमधील हिराचंद नेमचंद, संगमेश्‍वर, औरंगाबादमधील श्री मुक्तानंद, चंद्रपूर येथील सरदार पटेल आणि अमरावती येथील श्री शिवाजी महाविद्यालय यांचा समावेश आहे. या फेरीत नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सदगुरू गंगागीर विज्ञान, गौतम कला, संजीवनी वाणिज्य महाविद्यालयास बी प्लस प्लस ही श्रेणी मिळाली आहे.

नॅकच्या दुसऱ्या फेरीत मुंबईतील दोन महाविद्यालयांना ए, तर नांदेड, हिंगोली, सोलापूर येथील प्रत्येकी एका महाविद्यालयास बी प्लस आणि पालघर, गडचिरोली येथील दोन महाविद्यालयांना बी श्रेणी मिळाली आहे. या फेरीत पुण्यातील एकही महाविद्यालय नाही.

पहिल्या फेरीत इचलकरंजी येथील टेक्‍स्टाइल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला ए प्लस, सांगलीतील भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, कोंढव्यातील सिंहगड इंजिनिअरिंग ऍकॅडमी, वडगाव येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मुंबईतील गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांना ए श्रेणी मिळाली. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या वसंतराव पवार विधी महाविद्यालयास बी प्लस प्लस श्रेणी मिळाली आहे.

शिक्षण, संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी "ए' श्रेणी मिळाली होती. पर्यावरणवादी दृष्टिकोन ठेवून अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. पाण्याचा पुनर्वापर, टाकाऊ पाणी वाहिन्यांमध्ये सोडण्यापूर्वी विषारी घटक वेगळे करण्याचा प्रकल्पही उभारला आहे. त्यामुळे "ए प्लस' श्रेणीपर्यंत आम्हाला जाता आले.
- डॉ. आर. एस. झुंजारराव (प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय)
 

मागील मूल्यांकनात "बी' श्रेणी होती. त्यामुळे या वेळी अध्यापन, संशोधन याचा दर्जा वाढविण्यावर भर दिला. पायाभूत सुविधा दर्जेदार दिल्या. यामुळे ग्रंथालय आणि खेळाचा विभाग चांगले काम करू शकला. अनेक विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम आल्या आहेत. त्याचाही अ श्रेणी मिळविण्यासाठी उपयोग झाला.
- डॉ. पुष्पा रानडे (प्राचार्या, सिद्धिविनायक महाविद्यालय).

Web Title: Modern College "A plus" grade