पुणे : राजाराम पुलावर आता दुतर्फा अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक

अविनाश पोफळे
मंगळवार, 23 मे 2017

मेंगडे म्हणाले, "राजाराम पुलाचा लवकरच कायापालट होणार आहे. सिंहगड रस्ता परिसर आणि कर्वेनगर भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे.'' 

कर्वेनगर : राजाराम पुलावर आता दोन्ही बाजूनी अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक होणार आहे. त्याचबरोबर पुलाचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात 60 लाख रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता आणि कर्वेनगर भागाच्या सुंदरतेत भर पडणार असून, नागरिकांनाही व्यायामासाठी मुक्त वाव मिळणार आहे. 

सिंहगड रस्ता आणि कर्वेनगरला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. शहरात ये-जा करणारे नागरिक सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून या पुलाचा वापर करतात. तेथून डी.पी. रस्ता, नदीपात्र, म्हात्रे पूलमार्गे ये-जा करतात. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला तरुण-तरुणी सकाळी चालण्यासाठी, जॉगिंगसाठी डी.पी. रस्त्यावरील पदपथावर येतात. या नागरिकांना त्यासाठी आता या पुलाचाही उपयोग होणार आहे. 

पुलावर जॉगिंग ट्रॅकअंतर्गत सुरक्षित लोखंडी भिंत, पदपथाचे काम होणार आहे. तसेच सुशोभिकरणाअंतर्गत झाडे लावण्यात येणार असून, आकर्षक लायटिंग, रंगकाम, अत्याधुनिक दिवे आदी कामे होणार आहेत. त्यामुळे पुलाचा कायापालट होणार आहे. या कामासाठी नगरसेवक राजेश बराटे आणि सुशील मेंगडे यांना प्रत्येकी 30 लाख रुपये मिळणार असून, लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. 

बराटे म्हणाले, "या कामाचे लवकरच टेंडर लावण्यात येणार असून, त्यानंतर कामाची सुरवात होणार आहे. नागरिकांच्या दृष्टीने अधिकाधिक चांगल्या दर्जाचा जॉगिंग ट्रॅक करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण-तरुणींना जॉगिंग करताना, चालताना त्रास होणार नाही, याचाही विचार काम करताना होणार आहे.''