मोदी लाट ओसरू लागली, परिवर्तन निश्‍चित : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

बारामती शहर : ''विरोधकांकडे सर्वाधिक दुर्लक्ष करणारे पंतप्रधान व सरकार भाजपचे आहे. हुकूमशाहीची बीजे रुजविण्याचा भाजपचा प्रयत्न या देशातील लोकच हाणून पाडतील. मोदी लाट ओसरू लागली असून, परिवर्तन निश्‍चित घडेल,'' असा विश्‍वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. 

बारामती शहर : ''विरोधकांकडे सर्वाधिक दुर्लक्ष करणारे पंतप्रधान व सरकार भाजपचे आहे. हुकूमशाहीची बीजे रुजविण्याचा भाजपचा प्रयत्न या देशातील लोकच हाणून पाडतील. मोदी लाट ओसरू लागली असून, परिवर्तन निश्‍चित घडेल,'' असा विश्‍वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलने राज्यस्तरीय ओबीसी जनजागृती अभियानाचा समारोप आज बारामतीत झाला. त्या प्रसंगी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, ''संविधान बदलण्याची भाषा करणारे हे सरकार जातीयवादी आहे. सोळा मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढूनही सरकार हलायला तयार नाही. राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र, त्यांना दिलासा देण्यासाठी अजूनही सरसकट कर्जमाफी दिली जात नाही. सर्वांनी एकत्रितपणे प्रतिकाराची ताकद वाढवून या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.'' 

''ओबीसी, अल्पसंख्याक व मागासवर्गीयांना आरक्षण देणे दूरच उलट त्यांचे आहे. हे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,'' असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी केला. ते म्हणाले, ''समाजाच्या विविध घटकांत दुफळी माजविण्याचे पद्धतशीर काम सरकार करत आहे. मात्र, आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न झाला; तर समाज पेटून उठेल. ज्यांना आरक्षण मान्यच नाही, अशा विचारधारेच्या मागे सरकार जात आहे, हे दुर्दैवी आहे.'' 

आमदार रामराव वडकुते म्हणाले, ''ओबीसी समाज या पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल.'' 

प्रास्ताविकात राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी या जनजागृती अभियानाची पार्श्वभूमी विशद केली. ओबीसींच्या प्रश्नांकडे पाहण्यास या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वेळच नसल्याची टीका त्यांनी केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिलाध्यक्षा वनिता बनकर व अनिता गायकवाड यांनी स्वागत केले. 

'हल्लाबोल'चा समारोप पुण्यात 
पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाचा समारोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनी 10 जून रोजी पुणे शहरात करणार असल्याचे अजित पवार यांनी या वेळी सांगितले. 

''स्वतःला देशाचे चौकीदार व रखवालदार म्हणून घेणाऱ्या पंतप्रधानांच्या देखत नीरव मोदी, विजय मल्ल्या, चोक्‍सी यांनी देश लुटून नेला, तरी हे सरकार काहीही करू शकले नाही. देशाचे पंतप्रधानच जर उपोषणाला बसू लागले; तर देशवासीयांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे?'' 
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री 

Web Title: Modi wave is fading out, says Ajit Pawar