ड्रग्जमाफीयांवर मोकाच्या कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

तीन तस्करांना अटक; प्रथमच अशा प्रकारची कारवाई

तीन तस्करांना अटक; प्रथमच अशा प्रकारची कारवाई
पुणे - अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन माफीयांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्जमाफीयांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याची शहरात पहिलीच, तर राज्यात दुसरी घटना आहे. दरम्यान, पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी ड्रग्जमाफीयांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या मोकाच्या कारवाईमुळे ड्रग्जमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.

अलीशेर लालमहंमद सौदागर (वय 53), अशोक राजाराम भांबुरे (वय 33) आणि नीरज अर्जुन टेकाळे (वय 24, तिघे रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, शिवाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मोकांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्‍तालयात पाठविण्यात आला होता.
ही टोळी संघटितपणे गुन्हे करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या टोळीतील तिघांविरुद्ध अमली पदार्थांचा साठा, विक्री करणे तसेच अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असल्याचे गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात खडकी पोलिसांनी मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस सहआयुक्‍त सुनील रामानंद आणि अतिरिक्‍त आयुक्‍त शशिकांत शिंदे यांच्याकडे पाठविला. या प्रस्तावाची छाननी करून पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांविरुद्ध मोका कायद्यांर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

जमीन बळकावणाऱ्या लॅंडमाफीया, धान्याचा काळाबाजार करणाऱ्या आणि खंडणी बहाद्दरांविरुद्ध मोका कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. शहरात सध्या अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे दिसून येत आहे. युवा पिढी अमली पदार्थांपासून दूर राहावी, यासाठी पोलिसांनी ड्रग्जमाफीयांविरुद्ध कठोर पावले टाकण्यास सुरवात केली आहे.
- सुनील रामानंद, पोलिस सहआयुक्‍त