सरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी व त्यांच्या दुकानाची मोडतोड केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी गवळी टोळीच्या नऊ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून, तीन जणांना अटक केली आहे.

मंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी व त्यांच्या दुकानाची मोडतोड केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी गवळी टोळीच्या नऊ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून, तीन जणांना अटक केली आहे.

मोबीन मुजावर (वय 28, रा. दगडी चाळ, भायखळा मुंबई मूळ रा.वडगाव पीर ता. आंबेगाव जि. पुणे), सुरज राजेश यादव (वय 20, रा. वडगाव पीर), ओंकार पंचरास (खडकवाडी-लोणी) यांना अटक केली असून, बुधवार (ता. 25) पर्यंत आरोपींना घोडेगाव न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या गुन्ह्यातील आरोपी अमीर मुजावर, गोरक्ष पोखरकर इजाज- पुणे यांचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिस निरीक्षक प्रकाश धस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. धस म्हणाले, “सदर फिर्यादीचे लोणी येथे देशी दारू व बिअर बारचे दुकान आहे. दुकानात जाऊन मोबीन मुजावर व सुरज यादव याने 5 फेब्रुवारीला पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी फिर्यादीने माझे किडनी बदलली असून 25 लाख रुपये खर्च झाला आहे. मी पैसे देऊ शकत नाही. त्यानंतर आरोपींनी दुकानाची मोडतोड केली. फिर्यादीच्या भावाला मारहाण केली. ता. 24 फेब्रुवारीला मुंबई येथे दगडी चाळीत बोलवले तेथे दमदाटी करून 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीने पतसंस्थेतून कर्ज काढून आरोपींना एक लाख रुपये दिले. उर्वरित तीन लाख 50 हजार रुपये खंडणीसाठी आरोपीनी वेळोवेळी फिर्यादीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. दहशत निर्माण केली. मोडतोडी मध्ये दुकानाचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी फिर्यादीने मंचर पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 22) फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीवर ताबोडतोब कारवाई केली आहे. उर्वरित आरोपिनाही लवकरच अटक केली जाईल. ’’

दरम्यान, मंगळवारी (ता. 17) रोजी लोणी येथील कापड व ड्राय फूड च्या व्यापाऱ्या कडून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गवळी टोळीच्या तीन जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात मम्मी उर्फ आशा गवळी यांचेही नाव आले होते. त्यामुळे आशा गवळी यांनी राजगुरुनगरच्या सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यांना अटकपूर्व अंतरिम जामीन बुधवार (ता. 2 मे) पर्यंत न्यायालयाकडून मंजूर झाला आहे. याबाबतचे पत्र मंगळवारी (ता. 24 ) मंचर पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आशा गवळी यांच्यावर होणारी पोलिस कारवाई तूर्त टळली आहे.

Web Title: money demand of sarpanch gawali gang three members were arrested