पुणे: वानरांच्या उच्छादाने बोरकरवाडीतील ग्रामस्थ त्रस्त

जयराम सुपेकर
शनिवार, 8 जुलै 2017

बोरकरवाडी (ता. बारामती) गावात वानरांची एक टोळी आहे. या वानरांनी गाव व परिसरात मोठा उच्छाद मांडला आहे. गुरुवारी (ता. 6) प्राथमिक शाळेतील एका मुलीला एका वानराने चावा घेऊन जखमी केल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुपे - बोरकरवाडी (ता. बारामती) गावात वानरांची एक टोळी आहे. या वानरांनी गाव व परिसरात मोठा उच्छाद मांडला आहे. गुरुवारी (ता. 6) प्राथमिक शाळेतील एका मुलीला एका वानराने चावा घेऊन जखमी केल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एका वानराला बेशुद्ध करून कात्रज उद्यानात दाखल केले.

सुमारे दोन वर्षांपूर्वी दोन वानर गावात आली होती. येथील ग्रामस्थांनी त्यांना मोठ्या प्रेमाने खाऊ देऊन आतिथ्य केले होते. या दोन वानरांची आता बारा जणांची टोळी झाली आहे. एका लहान मुलाला दोन वानरे उचलून नेत असताना हुसकावले होते. तरुणांनी हुसकावल्याने त्यास सोडून दिल्याची माहिती येथील संतोष कुतवळ, सागर सावंत, प्रवीण कुतवळ यांनी दिली.

महिला स्वयंपाक करताना भाकरी टाकल्याच्या आवाजाच्या दिशेने ही टोळी येते आणि भाकरीचे टोपले घेऊन पसार होते. एकट्या माणसाने फिरणे गावात मुश्‍कील झाले आहे. सरपंच सीमा कुतवळ व शाळेने वन विभागाला पत्र देऊन कळवले होते. त्यावर प्रादेशिक वनविभाग बारामतीचे वन परिक्षेत्र अधिकारी एस. पी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मोरगावचे वन परिमंडळ अधिकारी वसंत देवकर यांनी वरिष्ठांना कळवून सायंकाळच्या दरम्यान कात्रज उद्यानातील पथकाने एका वानराला बेशुद्ध करून कात्रज उद्यानात दाखल केले.