#MonsoonTourism अंधारबन - पावसातील ट्रेक मृत्यूचा सापळा

Andharban
Andharban

वरुणराजाने हजेरी लावायला सुरवात केली आहे. आता निसर्ग हिरवाईने सजेल आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा पर्यटकांना खुणावू लागतील. वर्षाविहारासाठी पावले आपोआप पश्‍चिम घाटाकडे वळतील. मात्र, पावसात निसर्ग कधीही रौद्ररूप धारण करतो. तसेच, पावसामुळे काही ठिकाणे धोकादायक होतात. त्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटताना सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष जिवावर बेतू शकते. अशावेळी थोडी शिस्त बाळगून वर्षाविहाराचा आनंद लुटला पाहिजे. तसेच, या ठिकाणांवर प्रशासनाने विविध सुविधाही पुरवल्या पाहिजेत. याबाबतचा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांचा घेतलेला आढावा...

मुळशी तालुक्‍याला मोठे निसर्गसौंदर्य लाभले आहे. पावसाळ्यात तालुक्‍यात पर्यटकांची मोठी गर्दी होते. मुळशी धरण, अंधारबन, पळसे धबधबा, पिंपरीची दरी, ताम्हिणी घाट आदी परिसर पर्यटकांनी फुलून जातो. 

पिंपरीच्या तलावापासून हिरडी गावापर्यंतचा परिसर अंधारबनात गणला जातो. पिंपरी- अंधारबन- भीरा असा सुमारे १२ किलोमीटर जंगलातील पायवाटेने ट्रेक करतात. वाटेत दोन ओढे लागतात. पावसात प्रवाहाची ताकद वाढते. ओढा पार करण्याच्या प्रयत्नात पर्यटक वाहून सुमारे हजार फूट खोल दरीत मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पळसे येथे पर्यटक अरुंद निसरड्या पायवाटेने धबधब्याच्या उगमस्थानाकडे वरच्या बाजूस जाण्याचा प्रयत्न करतात, तो धोकादायक आहे. घसरून पडून जखमी होण्याच्या घटना येथे वारंवार होतात. काही वर्षांपूर्वी धबधब्यात पडून वाहून गेल्याने लहान मुलीचा मृत्यू झाला होता. मुळशी खुर्द ते निवे ठिकठिकाणी पर्यटक मुळशी धरणाच्या पाण्यात उतरतात. मात्र, गाळात रुतणे, पाण्याच्या खोलीचा अंदाज न येणे, फोटो काढताना पाण्यात पडणे, मद्यपान करून पोहणे, अशा प्रकारे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पिंपरी येथे सुमारे हजार फूट खोल कातळ दरी आहे. दरीतून ढगांकडे जाणारे धुक्‍याचे लोट व समोरील बाजूस अंधारबन हे छायाचित्र टिपण्यासाठी, सेल्फीसाठी अनेक जण रेलिंगची सुरक्षितता सोडून दरीच्या बाजूला उतरतात. ताम्हिणी परिसरातील चाचीवली, डोंगरवाडी, ताम्हिणी परिसराला पावसाळ्यात जोराच्या पावसात दरडी कोसळण्याचा धोका आहे. डोंगरातील दगड व माती वाहून रस्त्यावर येण्याचे प्रकार लवासा परिसरातही होतात. कैलासगड, घनगड, तैलबैल, कोराईगड, कैलासगडावर जाण्यासाठी जनावरांच्या पायवाटेने जावे लागते.

या पायवाटा पावसाळ्यात निसरड्या होतात. वरील बाजूचे दगड, माती निसटतात. कोराईगडावरील पठार मोठे असून पर्यटक किल्ल्यावर असलेल्या दोन तलावांत पोहतात; जीर्ण बुरूज, मोडकळलेल्या तटबंदीवरून चालतात, हे टाळावे. या तलावांतील गाळात रुतून पर्यटकांनी जीव गमावला आहे. 

धरणाच्या पाण्यात उतरू नका 
अंधारबनात सलग काही तास, दोन- तीन दिवस मोठा पाऊस झाला असल्यास जाऊ नये. पाणी जास्त असल्यास ओढे ओलांडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा परत मागे फिरावे. ओढे ओलांडताना सुरक्षा दोरीचा वापर करावा. पळसे येथील धबधब्याच्या वरील बाजूस जाऊ नये. मुळशी धरणाच्या व पिंपरी तलावाच्या पाण्यात उतरू नये. पिंपरी दरीत निसरडी माती, दगड, जोराचा वारा, दाट धुके यामुळे उतरण्याचा प्रयत्न जिवावर बेतू शकतो. धोकादायक ठिकाणांबाबतचे फलक ठिकठिकाणी लावावेत. धरणात उतरणाऱ्या ठिकाणांवर सुरक्षारक्षक नेमावेत व पर्यटकांना मज्जाव करावा. धबधब्यांच्या कडेने रेलिंग तयार करावेत. दरड कोसळणाऱ्या धोकादायक ठिकाणांकडे जाऊ नये. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com