#MonsoonTourism ट्रेकिंगचा आनंद लुटा संयमाने... 

treak
treak

पावसाळा सुरू झाला की, वेध लागतात ते वर्षासहलीचे आणि भटकंतीचे. पावसामुळे डोंगर, गडकिल्ले हिरवेकंच झालेले असतात. डोंगरावरील धबधबे खळाळून वाहत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी झाडे बहरून जातात. वनफुलांच्या चादरी चहूकडे पसरलेल्या असतात. पक्ष्यांचा गोड किलबिलाट हवाहवासा वाटू लागतो. शहराजवळील गडकोट साद घालू लागतात. महाविद्यालये सुरू झालेली असतात. नवीन मित्र, मैत्रिणी भटकंती करण्याच्या मूडमध्ये असतात. पण पावसाळा भटकंती करण्यासाठी जेवढा उत्तम; तेवढाच तो अपघातांच्या दृष्टीकोनातून धोकादायकदेखील आहे. गेल्या दोन वर्षांत असुरक्षित ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. धाडस आणि अनावश्‍यक धोका वाढल्याचा प्रकार या वर्षी जगाला बघावयास मिळाला. 

नको अति आत्मविश्‍वास 
पावसाळ्यात होणारे बहुतेक अपघात अतिआत्मविश्वास किंवा परिसराचे नसलेले भौगोलिक ज्ञान या गोष्टींमुळे होतात. कोणतेही नियोजन न करता विद्यार्थी, पालक वर्षासहलीला जातात आणि अपघात घडतात. ट्रेकिंग एक साहसी खेळच म्हणावा लागेल. खेळाचा अभ्यास आणि सराव केल्याशिवाय मैदानात उतरायचे नसते, याचे भान भटकंती करताना राहात नाही. ट्रेकिंगला जाताना पाऊस, दाट धुके, उंच डोंगर, खोल दऱ्या, निसरड्या वाटा आणि चिखल यांचा विचार केला जात नाही. कौटुंबिक सहलीसाठी आपण आपल्या परिवाराबरोबर अशा ठिकाणी दक्षतेच्या बाबी विचारात न घेता जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रणच. 

माहिती आधीच घ्या 
सध्या गिर्यारोहकांचे ग्रुप मोठ-मोठ्या जाहिराती करून ट्रेकिंग शिबिरे घेतात. पण यातील किती ग्रुप अधिकृत आहेत, याचा विचारदेखील पालक करीत नाहीत. भटकंती करताना आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत, त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती घेऊन आणि ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करूनच जायला हवे. गड, भुईकोट किल्ला, दरी, कडा वगैरे ठिकाणी भेट देताना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य सोबत बाळगावे लागते. त्यानुसार तयारी करावी. ट्रेकला जाताना शक्‍यतो ट्रेकिंग सॅक न्यावी. सॅक भरणे हीदेखील एक कला आहे. तसेच ट्रेकला जाताना शक्‍यतो ट्रेकिंग शूज अथवा सवयीचे असे मजबूत शूज असावेत. दगडधोंड्यांवरून चालताना पावलांजवळ तयार होणारी उष्णता आणि घाम यामुळे पायाची त्वचा मऊ होते. त्यामुळे जखमादेखील होऊ शकतात. वेळोवेळी शूज आणि सॉक्‍स काढून, घाम टिपून पायांची शक्‍य तितकी काळजी घेणे आवश्‍यक आहे. जर्कीन सोबत बाळगावे. शक्‍यतो रेनकोट टाळावा. ट्रेकदरम्यान जंगलाशी एकरूप होणारे आणि साधे, हलक्‍या रंगाचे कपडे असावेत. खूप भडक कपड्यांमुळे प्राणी आणि पक्षी विचलित होण्याची शक्‍यता असते. 

प्राण्यांना त्रास देऊ नका 
ट्रेकदरम्यान सोबत पाणी आणि अन्नपदार्थांचा भरपूर साठा सोबत बाळगणे आवश्‍यक आहे. पाणी जास्त असेल तर परतताना वाटेतल्या झाडांना घातले तरी निसर्ग संवर्धनाचे कामदेखील होईल. गडकिल्ल्यांवर पाण्याच्या टाक्‍यांमधले पाणी शुद्ध आहे का हे तपासावे. प्लॅस्टिक पिशव्या, केरकचरा असलेले पाणी रुमालाने गाळून घ्यावे. ट्रेक करताना प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासातून जावे लागते. आपला वावर त्यांच्यासाठी त्रासदायक होणार नाही, याची काळजी घ्यावी. साप, खेकडे, विंचू नेहमी दिसतात. त्यांना विनाकारण त्रास देऊ नये. पावसाळ्यात जळवादेखील चिकटू शकतात. त्यासाठी मीठ आणि जखम झाली तर हळद सोबत असणे आवश्‍यक आहे. होकायंत्र आणि नकाशे हेदेखील सोबत असावेत. आपण जाताना एखाद्या खुणेच्या आधाराने स्टार्टिंग पॉइंट आणि मार्ग बघून ठेवावा. भटकंती करताना स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, नाही का! 

नेहमी सोबत ठेवायच्या वस्तू 
- पावसापासून संरक्षण होईल असे कपडे 
- पुरेसे पाणी 
- खाद्यपदार्थ 
- औषधे 
- स्वीस नाईफ 
- काडेपेटी किंवा लायटर. (काडेपेटी भिजून पटकन निरुपयोगी होऊ शकते. लायटरच्या बाबतीत ही शक्‍यता कमी असते.) 
- प्लॅस्टिकच्या पिशव्या 
- जुनी वर्तमानपत्रे 
- छोटी शिट्टी 
- ओळखपत्र 
- चांगली बॅटरी आणि त्याचे सेल 
- पाच ते दहा मीटर नायलॉन दोरी 
- रोप (दोर) असणेदेखील आवश्‍यक 
- कंपास (दिशादर्शक) 

भटकंती करताना... 
- निसर्गात फिरताना कुठेही कचरा करू नये 
- ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखावे 
- कोणतेही व्यसन करू नये 
- धोक्‍याच्या जागी सेल्फी घेणे टाळावे 
- वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देऊ नये, कायद्यानेदेखील गुन्हा आहे. 
- जंगलात फळे, फुले तोडू नयेत 
 
हे टाळावे... 
- नवख्या ट्रेकर क्‍लबबरोबर जाणे टाळावे 
- ट्रेकर्सची संख्या जास्त नको 
- आजारी असल्यास ट्रेक टाळणे उत्तम 
- वाटाड्या घेतल्याशिवाय किल्ल्यावर जाऊ नये 
- रापलिंग, व्हॅली क्रॉसिंग, क्‍लायम्बिंग प्रशिक्षण घेतल्याशिवाय करू नये 
- स्थानिक गाववकऱ्यांशी वाद घालू नये 
- छायाचित्र काढताना उगाच स्टंट करू नयेत 
- वन विभाग, पुरातन खाते यांच्या नियमांचे पालन करावे 
- पावसाळ्यात अवघड किल्ल्यांवर जाणे टाळावे 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com