मतदान यंत्रांबाबत तीसहून अधिक दावे दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या आठवड्यात तीसहून अधिक उमेदवारांनी न्यायालयात महापालिका कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत. 

पुणे - महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या आठवड्यात तीसहून अधिक उमेदवारांनी न्यायालयात महापालिका कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत. 

प्रतिस्पर्धी उमेदवाराने केलेल्या प्रचारात आचारसंहितेचा भंग झाला आहे, मतदान यंत्रात घोळ आहे (ईव्हीएम मशिन) अशा विविध कारणांसाठी या पराभूत उमेदवारांनी दाद मागितली आहे. न्यायालयात या दाव्याचा निकाल काय लागेल तो लागेल, तो लागण्यास किती वेळ लागेल याची चिंता त्यांना नाही; परंतु चुकीचे प्रकार थांबले पाहिजेत, ही आमची भूमिका असल्याचे एका उमेदवाराने सांगितले. ऍड. म. वि. अकोलकर यांनी राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, निवडणूक निर्णय अधिकारी कुणाल कुमार आणि राज्य सरकार यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. त्यांनी ईव्हीएम मशिनद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध केला आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्‍टमधील तरतुदीनुसार मतदात्याला त्याने केलेले मतदान खरे नोंदविले गेले आहे का, हे जाणून घेण्याचा, त्याची मतमोजणी झाली का हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. हे "ईव्हीएम मशिन'च्या पद्धतीत शक्‍य नाही, असा दावा त्यांनी केला आहे. 1984 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतदान प्रक्रियेसाठी या मशिनचा वापर बेकायदा ठरविला आहे. कायद्यात बदल करून या मशिनचा वापर केला जात आहे. ही पद्धत चुकीची असून, या मशिनमध्ये मानवी हस्तक्षेप होऊ शकतो, ती सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ईव्हीएम मशिनऐवजी मतदान पत्रिकेचा वापर करावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. 

यांनी मागितली दाद 
न्यायालयाकडे दाद मागणाऱ्यांमध्ये विद्यमान सदस्यांप्रमाणेच इतर उमेदवारांचा समावेश आहे. माजी नगरसेविका कल्पना थोरवे, माजी नगरसेवक मिलिंद काची यांच्या पत्नी सीमा काची, पीएमपीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे, मनसेच्या माजी नगरसेविका वनिता वागस्कर, माजी नगरसेवक बाबू वागसकर, रूपाली पाटील आदींचा यात समावेश आहे. धर्माच्या आधारावर प्रचार करणे, मतदार याद्यातील घोळ, दुसऱ्या प्रभागातील मतदारांचा प्रभागात समावेश, बोगस मतदान, मतदान आणि मतमोजणी यांची आकडेवारी न जुळणे, मतदान यंत्र बंद पडणे, मतमोजणी चुकीच्या पद्धतीने झाली अशा विविध प्रकाराच्या तक्रारी या दाव्यात केल्या गेल्या आहेत.