डेंगीचा सर्वाधिक संसर्ग तरुणांना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

पुणे - डेंगीचा सर्वाधिक संसर्ग शहरातील तरुणांना होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुण्यातील डेंगी झालेल्यांपैकी तब्बल तीस टक्के रुग्ण पंचवीस ते चौतीस वर्षे या वयोगटातील आहेत. दिवसा कामानिमित्त तरुणांचा वावर अधिक होत असल्याने आणि डेंगीचा डास हा दिवसाच सक्रिय असल्याने तरुणांना हा संसर्ग अधिक होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पुणे - डेंगीचा सर्वाधिक संसर्ग शहरातील तरुणांना होत असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुण्यातील डेंगी झालेल्यांपैकी तब्बल तीस टक्के रुग्ण पंचवीस ते चौतीस वर्षे या वयोगटातील आहेत. दिवसा कामानिमित्त तरुणांचा वावर अधिक होत असल्याने आणि डेंगीचा डास हा दिवसाच सक्रिय असल्याने तरुणांना हा संसर्ग अधिक होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांमध्ये ४०८ रुग्णांना डेंगी झाल्याचे निश्‍चित निदान झाले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) या रुग्णांना डेंगी झाल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेने डेंगीच्या रुग्णांचे वय आणि लिंगनिहाय केलेल्या विश्‍लेषणातून ही माहिती पुढे आली आहे. 
डेंगीच्या प्रत्येक रुग्णाची नोंद महापालिकेत करणे डॉक्‍टर आणि प्रयोगशाळांवर बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश डॉक्‍टरांकडे उपचारांसाठी आलेल्या आणि प्रयोगशाळांमधून डेंगीचे निदान झालेल्या रुग्णांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागात संकलित करण्यात आली. या वर्षभरात आत्तापर्यंतच्या डेंगी झालेल्या ४०८, तर गेल्या दोन महिन्यांत ३१४ रुग्णांची नोंद झाली आहे. लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. शहरात डेंगीमुळे आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. 

शहरातील डेंगीचे रुग्ण

 स्त्रिया 187

पुरुष 221

वयोगटांची वर्गवारी
पुण्यात जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान आढळलेल्या प्रत्येक डेंगीच्या रुग्णाची महिनानिहाय माहिती महापालिकेने घेतली. रुग्णाचे वय आणि लिंग या आधारावर या माहितीचे विश्‍लेषण केले. राष्ट्रीय विषाणूजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत फॉर्म क्रमांक पाचच्या माध्यमातून ही माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे. त्यात वेगवेगळे सात वयोगट करण्यात आले असून, स्त्री आणि पुरुष अशी स्वतंत्र वर्गवारी करण्यात आली.

तरुणांनाच का झाला?
कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी फिरणाऱ्या तरुणांना डेंगीच्या ‘एडिस इजिप्ती’ या डासाचा डंख झाला आहे. कार्यालयासह बांधकामाच्या जागा, वातानुकूलन यंत्रात साचलेले पाणी येथे या डासांची अंडी सापडल्याचे निरीक्षण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. 

विश्‍लेषणाचा निष्कर्ष
शहरातील तरुण-तरुणींना डेंगीचा सर्वाधिक डंख झाल्याचा निष्कर्ष या विश्‍लेषणातून निघाला आहे. २५ ते ३४ वर्षे वयोगटांतील ७७ पुरुष आणि ४८ स्त्रिया डेंगीच्या तापाने फणफणल्या. ४५ ते ५४ वर्षे वयोगटांतील डेंगी झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हे करा

  • आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.
  • पाणी साठविलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावे.
  • घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.
  • घरांच्या भोवताली व छतावर वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेवू नये.

कामाच्या निमित्ताने तरुण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. हा डास दिवसा चावत असल्याने तरुणांना डेंगीचा संसर्ग जास्त झाल्याचे दिसते. पूर्ण बाहीचा शर्ट घालणे, हा डेंगीच्या डासांपासून संरक्षण करण्याचा प्रभावी मार्ग आहे. तसेच घरात डेंगी झालेल्या रुग्णांकडून इतर निरोगी सदस्यांना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.

Web Title: Most infected youth dengue