कामगारांच्या हातात आंदोलनाचे झेंडे

Movement flags in the hands of the workers
Movement flags in the hands of the workers

पुणे - राज्यातील शहरे स्वच्छ करण्यासाठी रात्रंदिवस झटणारे हात आता आपल्या मुलांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहेत. ‘अस्वच्छ व्यवसाय मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती’च्या मागणीसाठी सातत्याने चार वर्षे अर्ज-विनंत्या करूनही प्रशासकीय यंत्रणा हलत नसल्याने त्या विरोधातील आंदोलनाला बुधवारी पुण्यातून सुरवात झाली. 

अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना अस्वच्छ व्यवसाय मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत वर्षभरात त्या कामगारांच्या मुलाला एक हजार ८५० रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची तरतूद आहे. 

‘कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत’मधील कचरा वेचकांच्या मुलांना ती २०१३ मध्ये लागू करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत पुण्यातील एक हजार २७९ पैकी जेमतेम ५० मुलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आतापर्यंत शहर स्वच्छ करण्यासाठी झटणाऱ्या या हातांमध्ये आता सरकारचा निषेध करणारे फलक दिसणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागापुढे हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाची राज्यातील ही सुरवात आहे, असे हे कामगार आता सांगत आहेत. 

२०१६-१७ आणि २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या आणि या योजनेस पात्र असणाऱ्या एक हजार २७९ विद्यार्थ्यांची यादी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण खात्याला दिली आहे. शाळांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून मुलांना शिष्यवृत्ती देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासन यासाठी तांत्रिक कारणांची यादी वाचत असल्याची संतप्त भावना या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. 

पुण्यासह नाशिक, मुंबई, कोल्हापूर येथून दोन हजार ९७९ कामगार आहेत. त्यांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी गेली चार वर्षे प्रयत्न करीत असल्याचेही कामगारांनी सांगितले. याबाबत समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

प्रमुख शहरांमधील स्वच्छता  कर्मचाऱ्यांच्या मुलांची संख्या
पुणे    १८५०
नाशिक    १०००
मुंबई    २५०
कोल्हापूर    ४५०


वारंवार तांत्रिक कारणे पुढे करून प्रशासनाने शिष्यवृत्ती देण्यास टाळाटाळ केली आहे. शाळेतून सहल घेऊन जाताना न चुकता पालकांची स्वाक्षरी घेणाऱ्या शाळा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पुढे का येत नाहीत?
- राणी शिवशरण, आंदोलनकर्त्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com