विसरभोळ्या महावितरणचा ग्राहकांना 'शॉक' 

विसरभोळ्या महावितरणचा ग्राहकांना 'शॉक' 

पुणे : महावितरणच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी वीजबिल आकारणीच्या दरात बदल झाला; परंतु महावितरणला त्याचा विसर पडला. जुन्याच दराने आकारणी सुरू ठेवल्याने महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. लेखापरीक्षणात हे उघडकीस आल्यानंतर महावितरणने आता ग्राहकांना 'पंधरा दिवसांत थकबाकी भरा, नाहीतर वीजपुरवठा तोडू,' अशा नोटिसा पाठविण्यास सुरवात केली आहे. 

महावितरणकडून नियमितपणे वीजदर संकेतामध्ये बदल करण्यात येतो. बदल झाल्यानंतर त्याची दखल घेऊन त्यानुसार वीजबिलांची आकारणी करणे आवश्‍यक असते. 2012 मध्ये महावितरणकडून वीजदराच्या संकेतामध्ये बदल करण्यात आला. त्यामध्ये काही ग्राहक वर्गासाठी सार्वजनिक सेवा (पब्लिक सर्व्हिस) म्हणजे एचटी-9 (दरसंकेत) बदलून त्याऐवजी घरगुती दराने म्हणजे एलटी-1 (दरसंकेत) या दराने आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार बदललेल्या या दराने महावितरणकडून वीजबिलांची आकारणी करणे अपेक्षित होते; परंतु बदल न करता पूर्वीच्या दराने आकारणी सुरू ठेवण्यात आली. लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आल्यावर ग्राहकांकडे थकबाकी दाखवून त्यांच्याकडून वसुलीची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. 

भांबुर्डा येथील महावीर जैन विद्यालयास सहा वर्षांची जवळपास 44 लाख 30 हजार 300 रुपयांची थकबाकी असल्याची नोटीस महावितरणच्या गणेशखिंड सर्कलकडून पाठविण्यात आली आहे. पंधरा दिवसांत थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशाराही या नोटिशीत दिला आहे. अशाप्रकारे अन्य ग्राहकांनाही या नोटिसा पाठविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. वास्तविक महावितरणकडून झालेल्या चुकीचा फटका निष्कारण ग्राहकांना सोसावा लागत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. 

महावितरणकडून कायद्याचे उल्लंघन 
वीज कायदा 2003 मधील कलम 56 (2) मध्ये थकबाकी कशी आणि कधी वसूल करावी, याची स्पष्ट तरतूद केली आहे. त्यानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक काळ मागे जाऊन थकबाकी वसूल करता येत नाही; तसेच सलग दोन वर्षे थकबाकीची रक्कम दरमहा देण्यात येणाऱ्या बिलांमध्ये दर्शविण्यात आलेली असावी, असे म्हटले आहे. तसे नसेल, तर थकबाकी वसूल करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे; परंतु महावितरणकडूनच या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे या नोटिसांवरून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com