पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 

पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 

पुणे : मुंबईत झालेली अतिवृष्टी आणि इगतपुरी-कल्याण रेल्वे मार्गावर दुरांतो गाडीचे डबे घसरल्याचा फटका पुणे-मुंबई दरम्यानच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मंगळवारी बसला.

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या किंवा मुंबईमार्गे देशाच्या अन्य भागांत जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या उशिराने धावल्या. मुंबईकडून सायंकाळी पुण्याकडे येणाऱ्या चार गाड्या रद्द झाल्या. दरम्यान, उद्या (ता. 30) मुंबईकडे जाणाऱ्या आठ गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे प्रमाणेच एसटी महामंडळाच्या बसगाड्यांवर परिणाम झाला. या गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे आज मुंबईला जाणाऱ्या व तेथून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 

मुंबईतील जोरदार पावसामुळे वॉटर लॉगिंगचे प्रमाण वाढल्याने सर्व मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अन्य शहरातून मुंबईत येणाऱ्या रेल्वेंवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे मध्य रेल्वेला चार गाड्या रद्द कराव्या लागल्या. त्यामध्ये मुंबईहून मंगळवारी दुपारनंतर पुण्याला येणाऱ्या प्रगती, सिंहगड, डेक्कन क्वीन एक्‍स्प्रेस आणि पुणे-दौंड मार्गे विजयपुरा एक्‍स्प्रेस (दौंडपर्यंत) रद्द करण्यात आली. तर कोल्हापूर येथून पुणे मार्गे मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रद्द करावी लागली. बुधवारी सिंहगड, प्रगती, डेक्कन क्वीन, इंद्रायणी, इंटरसिटी या गाड्यांच्या पुणे आणि मुंबई या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज मुंबईहून उद्यान एक्‍स्प्रेस आणि कोइमबतूर या दोनच गाड्या सोडण्यात आल्या. इतर गाड्या रद्द झाल्या. 

एसटीच्या पुणे-मुंबई मार्गावर शिवनेरीसह निमआरामबसच्या शेकडो फेऱ्या होतात. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबईला जाणाऱ्या सर्व महामार्गांची वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, तोपर्यंत एसटीची बस सेवा सुरूच होती. मात्र मुंबईतून बाहेर पडण्यासाठी बसला खूप वेळ लागत होता. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा एसटी बस दोन ते अडीच तासांनी उशिराने धावत होत्या. याचा परिणाम पुणे-मुंबई टॅक्‍सी सेवेवरही झाला. मुंबईत जोरदार पाऊस आसल्याचा मेसेज पुण्यातील टॅक्‍सी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आला. त्यामुळे अनेक टॅक्‍सीचालकांनी मुंबईला जाणे टाळले. तर सकाळी गेलेल्या टॅक्‍सी उशिरा मुंबईत पोचल्या. मुंबईवरून सकाळी पुण्याकडे टॅक्‍सीने निघालेल्या प्रवाशांनादेखील पुण्यात येण्यासाठी सायंकाळ झाली असल्याचे असोसिएशनचे उत्तर चवरे यांनी सांगितले. 

रेल्वे गाड्यांच्या नियोजनात करण्यात आलेल्या बदलामुळे पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र उद्या (ता. 30) पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या बहुतांश सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी सांगितले. 

मुंबईकडे येणारे सर्व मार्ग बंद 
पावसामुळे मुंबईकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूकही थांबविण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला. या मार्गावरील कुसगाव आणि उर्से टोलनाक्‍यावर वाहतूक बंद करण्यात आली. तर सायंकाळी साडेसहानंतर मुंबईकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. तसेच जुना मार्गही बंद ठेवण्यात आला असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.

बोरिवली, ठाणे, दादरची बससेवा विस्कळित 
पुण्याहून दादरला जाणाऱ्या बस पावसामुळे वाशीपर्यंत धावल्या. बोरिवली आणि ठाण्याला जाणाऱ्या बस अडथळा न असल्याने पुण्याहून बोरिवलीला जाणाऱ्या बस सायन, पवईमार्गे बोरिवलीला पोचल्या. तर ठाण्याला जाणाऱ्या बसला अडथळा आला नाही. मात्र दादरहून पुण्याला येणाऱ्या एसटी बस पुन्हा मुंबईला सोडण्यात आल्या नाहीत. तर प्रवासी नसल्यामुळे देखील मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या महामंडळाकडून रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. उद्या (ता. 30) पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या बस वाशी अथवा चेंबूरपर्यंत जाऊ शकतील, अशी शक्‍यता काही अधिकऱ्यांनी बोलून दाखविली. 

डेक्कन, इंद्रायणी, इंटरसिटी, तपोवन एक्‍स्प्रेस रद्द 
मुंबईवरून उद्या (ता. 30) सोडण्यात येणाऱ्या डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्‍स्प्रेस, इंटरसिटी एक्‍स्प्रेस, तपोवन एक्‍स्प्रेस, महालक्ष्मी एक्‍स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुण्यातून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्‍स्प्रेस, सिंहगड एक्‍स्प्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्‍स्प्रेस या गाड्या दोन्ही बाजूंनी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com