महापालिकेत युती, की ‘पुणे पॅटर्न’

महापालिकेत युती, की ‘पुणे पॅटर्न’

विक्रमी मतदानामुळे त्रिशंकू स्थितीची शक्‍यता; जादा मतांच्या फायद्याबाबत उलटसुलट चर्चा

पिंपरी - महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजे ६५.३५ टक्के मतदान करून पिंपरी-चिंचवडकरांनी विक्रम प्रस्थापित केला. या जादा मतांचा फायदा नेमका कोणाला होणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मतदानाचा वाढलेला टक्का थेट भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात जाणार असल्याने महापालिकेत सत्तेसाठी भाजप-शिवसेनेची युती किंवा राष्ट्रवादीला अपक्षांच्या मदतीने किंवा प्रसंगी शिवसेनेला बरोबर घेऊन ‘पुणे पॅटर्न’ अमलात आणावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

मंगळवारी शहरात सर्वच भागांत विक्रमी मतदान झाले. यात तरुणांचा वाढलेला सहभाग प्रकर्षाने जाणवला. विशेष म्हणजे ज्या भागांत झोपडपट्ट्यांचे मतदान होते, तेथे सायंकाळनंतरही लांबलचक रांगा लागल्या होत्या. या केंद्रांवर रात्री दहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. शहराच्या सर्वच भागांत मतदानाचा उत्साह जाणवत होता. मोशी गावठाण, गंधर्वनगरी, चऱ्होली भागात सर्वाधिक म्हणजे ७९.८२ टक्के मतदान नोंदविले गेले. शहरात ११ लाख ९२ हजार ८९ मतदारांपैकी सात लाख ७९ हजार ६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच मतदान झाले. २०१२ च्या निवडणुकीत ५४.८४ टक्के मतदान झाले होते. 

या वेळच्या निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवोदित तरुण मतदारांची संख्या. ही सुमारे एक लाख १६ हजार इतकी आहे. बहुतांश तरुणांचा कल भाजप-शिवसेनेकडे; तर ज्येष्ठ मतदारांचा कल ‘राष्ट्रवादी’कडे दिसत होता. त्यामुळे कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, हे स्पष्टपणे सांगता येणे कठीण आहे. या वेळच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळात व त्या अगोदर दोन-तीन वेळा शहराला भेट दिली. निवडणुकीत त्यांनी स्वतः लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली. फडणवीस विरुद्ध अजित पवार, अशी ही लढत झाल्याने भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदा मोठे आव्हान दिले. राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागली.

मात्र, एकीकडे राष्ट्रवादीला आव्हान देत असताना भाजपने उमेदवारी देताना जुन्या लोकांना डावलून त्यांची नाराजी ओढवून घेतली. पक्षात ऐनवेळी दाखल झालेल्या बड्या नेत्यांमुळे भाजपमधील एक मोठा गट अखेरपर्यंत निवडणुकीपासून दूर राहिला. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्‍यता असल्याने स्वबळावर सत्तेपर्यंत येण्याची स्थिती असताना अंतर्गत नाराजीमुळे भाजपला मागे सरकावे लागणार आहे. दुसरीकडे शिवसेनेबरोबर निवडणुकीत युती झाली नाही. त्यामुळे युतीची मते विभागली गेली. त्याचाही फटका दोन्ही पक्षांना बसणार असल्याने राष्ट्रवादी काठापर्यंत पोचेल; पण स्पष्ट बहुमतापासून दूरच राहील. परिणामी, पुन्हा सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अपक्षांची मदत घ्यावी लागेल.

शिवाय या वेळी अपक्ष उमेदवार हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच निवडून येण्याची शक्‍यता आहे. अशावेळी सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेला बरोबर घेऊन पुणे पॅटर्न राबवावा लागेल. भाजप-शिवसेनेचे संबंध पाहता ही शक्‍यता अधिक आहे. 

नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाजप-सेना युती पुन्हा मुंबई महापालिकेत बरोबर असण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युती केंद्र व राज्य सरकारसाठी कायम राहणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे मुंबईत युती झाली, तर पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप-शिवसेनेला जवळ यावे लागेल. शिवाय पुणे पॅटर्न जनतेला रुचणार नाही.

मॅजिक फीगरसाठी तारेवरची कसरत
स्पष्ट बहुमतासाठी भाजप किंवा राष्ट्रवादीला ६५ जागांची आवश्‍यकता आहे. राष्ट्रवादीला ५५ ते ६० जागा मिळण्याची शक्‍यता आहे; तर भाजपला ४९ ते ५२ आणि शिवसेनेला २४ ते २८ जागा मिळण्याची शक्‍यता आहे. याशिवाय काँग्रेस, मनसे व अपक्षांना दोन ते चार जागा मिळण्याची शक्‍यता आहे. मॅजिक फीगर मिळविण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com