पुणे महापालिकेच्या ‘ई-लर्निंग’ शाळा कागदावर

Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation

येरवडा : महापालिकेचा विशेषत: वस्त्यांमधील मुला-मुलींना ई-लर्निंगच्या माध्यमातून सहज व आनंददायी शिक्षण देता यावे हा उद्देश आहे. मात्र याशाळांमध्ये ’ ई-लर्निंग’ नावालाच असल्याचे दिसते. वर्गांतील या निर्जीव भिंतींवर बसविण्यात आलेले‘एलईडी’ स्क्रिन कधी संवाद साधतील याची प्रतिक्षा विद्यार्थ्यांना आहे.

महापालिकेने शहरात पाच ई-लर्निंग स्कुल सुरू केल्या आहेत. तर तब्बल शंभर ई-लर्निंग स्कुल सुरू करण्याच्या प्रस्ताव आहे. सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र येरवड्यातील क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळा, हडपसर, औंध व पर्वती दर्शन येथील ई-लर्निंग शाळा केवळ कागदावरच आहेत. यातील लहुजी वस्ताद शाळेला सहा वर्ष पूर्ण होत आहेत. येथील शाळेच्या भौतिक सोई-सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिल्यास या शाळेला ई-लर्निंग शाळा का म्हणावे असा प्रश्‍न पडतो.

विमानतळ रस्त्यावर तब्बल बारा कोटी रुपये खर्च करून लहुजी वस्ताद ई-लर्निंग शाळेची इमारत बांधली आहे. शाळेत नर्सरी ते इयत्ता सातवी पर्यंतचे वर्ग असून पटसंख्या नऊशे आहे. शाळेत २६ वर्ग आहेत. यापैकी वीस वर्गात एलईडी स्क्रिन बसविण्यात आले आहेत. मात्र वर्गासाठी आवश्‍यक सॉफ्टवेअर बसविण्यात आले नाही. त्यामुळे नियमित , कंत्राटी व खासगी संस्थेचे शिक्षक आपल्या क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवितात.

‘सकाळ’ च्या प्रतिनिधीने येथील इयत्ता चौथीच्या वर्गाला भेट दिली असता तेथे एक कंत्राटी शिक्षक विद्यार्थ्यांना फळ्यावर काही इंग्रजी वाक्य लिहून देत होते. पाच वाक्यांच्या ओळींमध्ये चार चुका होत्या. ‘एलिफंट’, ‘पॅरोट’ स्पेलिंग चुकले होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया गायकवाड व पर्यवेक्षिका गुजर यांनी शिक्षकाची चुक दाखविली. मात्र घाईत लिहिल्यामुळे चूक झाल्याची सारवासारव संबंधित शिक्षकाने केली.

‘‘लहुजी वस्ताद शाळेत पुरेसे शिक्षक दिले आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित आहे. इतर सोई-सुविधा बाबत महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे.’’
- सुभाष सातव, सहायक शिक्षण अधिकारी, 

विद्यार्थ्यांचे प्रयोग ‘यु ट्यूब’वर 
लहुजी वस्ताद ई-लर्निंग शाळेत ‘टीच फॉर इंडिया’ संस्थेचे शिक्षक विद्यार्थ्यांना वस्तुमान,गुरूत्त्वाकर्षण,ऊर्जा, शक्ती आदींचे प्रयोग करून दाखवित होते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या मदतीने केलेले हे सर्व प्रयोग शिक्षकांनी मोबाईलवर चित्रिकरण करून ‘यु ट्युब’वर अपलोड केले आहेत. ही एक सकारात्मक बाब शाळेत दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com