नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पुणे - पुणे जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. प्रचाराच्या तोफा मंगळवारी (ता. १३) रात्री दहा वाजता थंडावणार आहेत. त्यानंतर सर्वच पक्षांचे उमेदवार मंगळवारी रात्री दहापासून बुधवारी सकाळपर्यंत विजयासाठी गुप्त खलबते करण्यात आघाडी घेण्याची शक्‍यता आहे. अनेक पालिकांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. 

प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी प्रमुख नेत्यांनी पालिकांच्या कार्यक्षेत्रात जाहीर सभा घेतल्या. 
जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, सासवड, जुन्नर, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा या सहा पालिकांमध्ये मोठ्या चुरशीच्या लढती होत आहेत. इंदापुरात काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध राष्ट्रीय समाज पक्ष, सासवडमध्ये काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना आघाडी, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा येथे भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा लढती होत आहेत.  

जिल्हा प्रशासनाने प्रचार संपल्यानंतरची रात्र पूर्ण जागून काढण्याची तयारी सुरू केली आहे. रात्री-अपरात्री काही गैरप्रकार करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी काही पथके सज्ज ठेवली आहेत. या वृत्ताला प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची खबरदारी घेण्याच्या उद्देशाने उद्यापासून (मंगळवार) तीन दिवस जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्याचा आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला आहे. 

गैरप्रकार रोखण्यास प्रशासन सज्ज
नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या धनाढ्य उमेदवारांकडून मंगळवारी रात्री मतदारांना विविध आमिषे दाखविण्याचे प्रकार घडण्याची शक्‍यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे.