‘अशी’ निवडणूक, नको रे बाबा...

‘अशी’ निवडणूक, नको रे बाबा...

महापालिकेची यावेळेची निवडणूक ज्यांनी जवळून अनुभवली त्यांच्या ओठी एकच शब्द आहेत... असली निवडणूक, नको रे बाबा... इतकी भयंकर, इतकी खर्चिक, इतकी डावपेचांची, आयुष्याची अद्दल घडवणारी. पैशापरी पैसे गेले अन्‌ पत प्रतिष्ठाही धुळीस मिळाली. काही जणांनी बापजाद्यांची जमीन विकली. एकाने वारसा हक्काने चालत आलेल्या तीन मजली घराचा सौदा केला. एका महाभागाने घरदार गहाण ठेवून दोन कोटींचे कर्ज डोक्‍यावर केले. एकाने दोन कोटी वाटले, तर दुसरा चार कोटी खर्च झाल्याचे सांगतो.

भोसरीकरांच्या भाषेत सांगायचेच, तर एक पॅनेल म्हणजे एखाद्या चार बैलांचा नांगर किंवा गाडा. चारही बैल एकसाथ पळाले तर गाडा १४ सेकंदात येतो. जिथे पुढे मागे झाले, तिथे एक जिंकला, दुसरा आपटला. जिंकलेले मोठ्या कष्टाने जिंकलो म्हणून रडले आणि हारलेलेसुद्धा सर्वस्व गमावले म्हणून ढसाढसा रडले. काही घरांमध्ये दोन-तीन दिवस स्मशानशांतता होती. कोणी नशिबाला दोष दिला, तर कोणी ‘ईव्हीएम’ (इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्होटिंग मशिन)मध्ये खोट होती म्हणून आकांडतांडव केला. लोकशाही, हुकूमशाही, राजेशाहीमध्ये त्यातल्या त्यात कमीत कमी दोष म्हणून लोकशाही निवडली. ६७ वर्षांत आपली लोकशाही इतकी कुरूप, विद्रूप आणि नकोनकोशी का झाली याचाही आता गांभीर्याने विचार झाला पाहिजे.

पैशाचा तोरा अन्‌ आडाण्याचा गाडा 
निवडणूक रिंगणात ७७३ उमेदवार होते. त्यातील ठरल्याप्रमाणे १२८ जिंकले आणि बाकीचे ६४५ हारले. जवळपास ४०० लोकांची अनामत जप्त झाली. भाजपचे ७० टक्के उमेदवार हजारावर मताधिक्‍य घेऊन जिंकले. निवडून आलेल्यांमध्ये पाच कोटींवर मालमत्ता असलेल्या धनवान कारभाऱ्यांची संख्या ४० आहे. तीन कोटींवर संपत्ती असलेले २५ नगरसेवक आहेत. १०० कोटींची स्थावर असलेलेही आहेत. सर्वाधिक ‘श्रीमंत’ पूर्वी राष्ट्रवादीकडे असत, आता भाजपकडे आहेत. निवडणुकीत दोन-पाच कोटी खर्च करायची तयारी असणाऱ्यांनाच उमेदवारी हा पहिला निकष होता. थोडक्‍यात, आता निवडणूक ही गरिबांसाठी आवाक्‍यात राहिलेली नाही, संपलेली आहे.

मतांच्या खरेदी- विक्रीचे खेळ पाहिले तेव्हा ज्यांनी नगरसेवक होण्यासाठी पक्ष कार्यालयात आयुष्यभर सतरंज्या उचलल्या, त्या कार्यकर्त्यांनी आता हा विचारच करू नये, असा प्रामाणिक सल्ला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध देशात, राज्यात आंदोलने करून घरादारावर तुळशीपत्र ठेवणारा मारुती भापकर पडतो आणि गुन्हेगारी विश्‍वातून आलेली व्यक्ती जिंकते, तिथेच राजकारणाची घसरगुंडी किती झाली ते दिसले.

नगरसेवकांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि व्यवसाय यांचा आलेख सर्व जनतेनेसुद्धा आवर्जून डोळ्यांखालून घातला पाहिजे. इयत्ता नववी, १० वी, १२ वी उत्तीर्ण मंडळींचाच भरणा जास्त आहे. पदवीधर, द्विपदवीधर आहेत; पण तज्ज्ञ, विचारवंत, डॉक्‍टर, वकील, अभियंता, सीए, प्राध्यापक, मान्यवर उद्योजक, व्यापारी किंवा खरा समाजसेवक या यादीत दिसत नाही. थोडक्‍यात, हा आडाण्याचाच गाडा झाला. धंदापाणी पाहिला तर उद्योजक म्हणून जमीन दलालांचाच सर्वाधिक भरणा आहे. लोकांच्या जमिनींवर ताबा ठोकणारे भूमाफिया ‘व्यावसायिक’ म्हणून या लोकांमध्ये घुसलेत. सर्व पक्षांचे मिळून ११ गुन्हेगारसुद्धा सभागृहात आलेत. मुळात बहुतांश उमेदवारांचा हा गैरसमज असतो, की निवडून आलो म्हणजे पैशाचा पाट सुरू होतो. 

अवघे सात हजार मानधन असणाऱ्या या पदासाठी लोक दोन- चार कोटी खर्च करतात. हा सरळ सरळ आतबट्ट्याचा व्यवहार होतो. गुंतवणूक म्हणून निवडणुकीत पैसे खर्च करतात आणि नंतर विकासकामांतून दामदुप्पट पैसे वसूल करतात. तिथेच भ्रष्टाचाराचा उगम होतो. मताला चार- पाच हजार रुपये मोजलेले कारभारी नंतर मुजोर होतात. दोन दोन उमेदवारांचे पैसे घेऊनही काही लोकांनी तिसऱ्याला मत दिल्याची उदाहरणे आहेत.

झोपडपट्टीपेक्षा चाळी आणि बंगलेवाले अधिक लाचार दिसले. माणुसकी, स्वाभिमान सर्व विकला. लोकशाहीचाच सौदा झाला. या सर्व उलटापालटीमध्ये सज्जन, सुसंस्कृत, देशाभिमानी, निरपेक्ष लोक अभावानेच आढळले. अशी लोकशाही आपल्या देशाला कुठे नेणार, हा प्रश्‍न आहे. उडदामाजी काळे गोरे शोधून संसार करायचा, यथा राजा तथा प्रजा, ही म्हण आता पुरती उलट झाली. जनताच भ्रष्ट झाली, त्यामुळे कारभारीही त्याच प्रकारचे मिळणार. मतदान ६५ टक्के झाले; पण सात लाख मतांमध्ये तब्बल ८७ हजारांवर नागरिकांनी ‘नोटा’ (...यापैकी एकही लायकीचा नाही) असे बटन दाबले. हा धोक्‍याचाच इशारा आहे. सज्जनांचा लोकशाहीवरचा विश्‍वास ढळू लागल्याचे हे लक्षण आहे. निवडणूक प्रक्रियेतील पैशाचा वापर, गुंडागर्दी, गैरप्रकार संपले पाहिजेत. मोदी- फडणवीसजी त्यासाठी काही ठोस करतील, अशी अपेक्षा करूया. अन्यथा, भ्रष्टाचाराचे महामेरूच भुजंग म्हणून सर्व हडपतील. सावध असा !!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com