इच्छुकांमध्ये धाकधूक सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचना आपल्याला अनुकूल असेल का, आरक्षण सोयीचे पडेल का, जुना भाग नव्या प्रभागात समाविष्ट असेल का, याची धाकधूक बहुसंख्य नगरसेवकांच्या मनात गुरुवारी होती. तर इच्छुकांचीही भिस्त सोडत आणि आरक्षणाकडे असल्यामुळे त्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचना आपल्याला अनुकूल असेल का, आरक्षण सोयीचे पडेल का, जुना भाग नव्या प्रभागात समाविष्ट असेल का, याची धाकधूक बहुसंख्य नगरसेवकांच्या मनात गुरुवारी होती. तर इच्छुकांचीही भिस्त सोडत आणि आरक्षणाकडे असल्यामुळे त्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांमधील आरक्षणाची सोडत आणि प्रभागरचना शुक्रवारी (ता. ७) सकाळी अकरा वाजता स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जाहीर होणार आहे. यंदाची निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होणार असल्यामुळे शहरातील प्रभागरचना संपूर्णतः नव्याने होणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागांची मोडतोड होईल. प्रभाग पद्धतीमध्ये कोणता नवा भाग समाविष्ट होणार आणि कोणता भाग वगळला जाणार, त्यातून नवा प्रभाग कसा असेल, यावर बहुतेक विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून असेल. आरक्षणे सोडत पद्धतीने निश्‍चित होणार असून, त्याबाबतची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याचे महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांनीही पाहणी करून तयारीचा आढवा घेतला. नव्याने होणाऱ्या प्रभागरचनेबाबत महापालिका प्रशासनाने गोपनीयता बाळगली आहे. तरीही अनेक नगरसेवक संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या प्रभाग रचनेबद्दल काही माहिती मिळते का, याची चाचपणी करताना गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहेत.  

तसेच ‘प्रभागरचना समजली,’ ‘माझा प्रभाग असा झाला, हा भाग त्यात आला आहे,’ असेही काही नगरसेवक सांगत होते. ‘प्रभाग तर झाला, आता फक्त आरक्षणाची परीक्षा आहे,’ असा दावाही काही जण करीत होते. 
प्रभाग रचनेबाबत राजकीय वर्तुळात गेल्या आठवड्यापासून चर्चेला उधाण आले आहे. गटनेत्यांनी त्यांचे प्रभाग त्यांना हवे तसे करून घेतले, आयुक्तांनी त्यांना साथ दिली, तर भाजपने स्वतःसाठी अनुकूल प्रभाग रचना करून घेतली, काही जणांना संपविले, अशाही वावड्या उठत महापालिकेत चर्चा रंगली होती.

महिलांचा टक्का वाढणार ?
यंदाच्या निवडणुकीत ४१ प्रभागांतून १६२ सदस्य नशीब अजमावणार आहेत. महिलांसाठी ८१ जागा आरक्षित आहेत. मात्र, महिला आणि पुरुषांचे मिळून ११५ जागांवर आरक्षण असेल तर, ४७ जागा सर्वसाधारण (खुल्या) असतील. त्या जागांवरही महिला निवडणूक लढवू शकतात. सध्याच्या महापालिकेत दोन महिला सदस्या खुल्या गटातून निवडून आल्या आहेत. त्याचाही संदर्भ महापालिका वर्तुळातील चर्चेत दिला जात होता.

Web Title: municipal election ward structure & reservation