निवडणूक... वॉर्ड की प्रभागानुसार? 

pmc-election
pmc-election

यंदाच्या महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने होत आहेत. 2007 ची निवडणूक वगळता 2002 पासून प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याकडे सरकारचा कल राहिला. दोन- तीन आणि आता चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग अशा पद्धतीने निवडणुका होत आहेत. प्रत्यक्षात मात्र प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यास खरी सुरवात 1967 मध्ये झाली. त्या वेळी महापालिका निवडणुका या सहा वॉर्डांचा मिळून एक प्रभाग अशा पद्धतीने झाल्या होत्या, त्यामुळेच प्रभाग पद्धत ही पुणे महापालिकेसाठी नवी राहिलेली नाही. 

पुणे महापालिकेचा गौरवशाली इतिहास पहिला, तर या पालिकेने सातत्याने राज्याला दिशा देणारे अनेक निर्णय घेतले. त्यातून निवडणुकीतील लोकांचा वाढलेला सहभाग, खर्च कमी, प्रशासनावरील ताण कमी झाला असे अनेक बदल झाले. त्यापैकी एक म्हणजे प्रभाग पद्धत. हा देखील पुणे महापालिकेने घालून दिलेला एक पायंडा. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 1967 मध्ये प्रथम प्रभाग पद्धतीचा अवलंब झाला. त्या वेळी शहराची हद्द आणि लोकसंख्या मर्यादित होती. सभागृहातील सदस्यांची संख्या कमी होती. त्या वेळी शिवाजीनगर ते येरवडा अशा सहा वॉर्डांचा मिळून एक प्रभाग होता. यातून बाबूराव सणस, एल. टी. सणस, टिकमदास मेमजादे असे सहा नगरसेवक निवडून आले होते. आताचा भाजप त्या वेळी जनसंघाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता, तर पक्षाचे चिन्ह पणती होते. कॉंग्रेसचे बैलजोडी, प्रजासमाजवादी पक्षाची झोपडी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीचे खटारा, तर मार्क्‍सवादी पार्टीचे (लेनिन) विळा-कणीस हे चिन्ह होते. अनेक नामवंत या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्या वेळीही एवढ्या मोठ्या प्रभागातील मतदारांपर्यंत पोचणे उमेदवारांना अडचणीचे वाटत होते. 

महाराष्ट्रात 1971 मध्ये दुष्काळ पडला. पाणी, चारा, अन्नटंचाई निर्माण झाली होती. त्या वेळी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अशा परिस्थितीत 1972 मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या वेळी पुन्हा कायद्यात बदल करून प्रभागऐवजी वॉर्डपद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून अगदी 2002 पर्यंत वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका होत आल्या. मात्र, त्यानंतर पुन्हा सरकारने कायद्यात बदल करीत प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यास मान्यता दिली. त्यामुळे 2002 मध्ये तीन वॉर्डांचा मिळू एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका झाल्या. एकाच प्रभागात वेगवेगळ्या पक्षांचे सभासद निवडून आल्यामुळे त्याचा परिणाम शहराच्या विकासकामांवर झाला. प्रभाग पद्धतीने वाद निर्माण होत असल्याने पुन्हा वॉर्ड पद्धतीनेच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी झाली. त्यामुळे 2007 च्या निवडणुका वॉर्ड पद्धतीने झाल्या. मात्र, त्यानंतर 2012 च्या निवडणुका पुन्हा प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या वेळी दोन की चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग पद्धतीने निवडणुका घ्याव्यात, यावरून चर्चा झाली. चारच्या प्रभाग पद्धतीला मोठा विरोध झाला. 

महापालिकेच्या सभागृहाने दोन वॉर्डांचा मिळू एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका घ्याव्यात, असा ठराव पारित केला. सरकारने दखल घेत दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका घेतल्या. दोन वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्यात सत्ताबदल झाला. 2002 मधील अनुभव लक्षात घेऊन प्रभाग पद्धतीने निवडणुका घेतल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो, हे लक्षात आल्याने सरकारने चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com