आर्थिक मंदीतही पालिकेची चांदी

आर्थिक मंदीतही पालिकेची चांदी

घरखरेदीसाठी ग्राहकांची पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडला पसंती; गृहप्रकल्प जोमात
पिंपरी - बांधकाम क्षेत्रात सर्वत्र मंदीचे सावट असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र बांधकामे जोमात सुरू आहेत. चांगल्या पायाभूत सुविधा आणि पुण्याच्या तुलनेत कमी किमती यामुळे नागरिक घर घेण्यासाठी पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडला अधिक पसंती देत आहेत. महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या ३१ मार्चच्या आकडेवारीवरून ही बाब अधिक स्पष्ट होते. 

आर्थिक मंदी, केंद्र व राज्य सरकारांचे बदललेले बांधकामविषयक धोरण यामुळे बांधकाम क्षेत्र आर्थिक संकटात आहे; तसेच नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीचाही मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. या परिस्थितीत राज्यात सर्वत्र बांधकाम व्यवसाय तग धरून राहण्याचा प्रयत्न करीत असताना पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द व परिसरात मात्र बांधकामांची चांगलीच बूम सुरू आहे. नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी परिसरात बहुमजली गृहप्रकल्पांची काम हाती घेतली असून, अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. 
 

पुण्यापेक्षा जादा मिळाला महसूल
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने मिळविलेला महसूल पुणे महापालिकेपेक्षा सरासरीने जास्त आहे. पुण्याचे उद्दिष्ट १०५० कोटी रुपयांचे होते. त्यापैकी फक्त ५३२ कोटी रुपयांचे उत्पन्न पुण्याच्या बांधकाम परवानगी विभागाने मिळविले. हे उत्पन्न जेमतेम ५० टक्के इतके आहे. या तुलनेत पिंपरी-चिंचवडने ९७.६२ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकामाचा वेग वाढल्याचे स्पष्ट होते. 
 

दृष्टिक्षेपात बांधकामे अन्‌ महसूल

गृहप्रकल्प जोमात : वाकड, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी, मोशी, चिखली, चऱ्होली 
वर्षभरात महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवानगी : सुमारे साडेअकराशे प्रकल्प
बांधकाम परवानगी विभागाचे २०१६-१७ चे महसूल उद्दिष्ट : ३६० कोटी
मार्च २०१७ अखेर महसूल जमा : ३५१ कोटी ४४ लाख ५६ हजार ७५३ रुपये
नगररचना विभागाचे विकास हस्तांतर (टीडीआर), छाननी शुल्क व नागरी वाहतूक निधीतून उत्पन्न : १३० कोटी ४४ लाख ७४ हजार १४५ रुपये
महसूल वसुलीची उद्दिष्टपूर्ती : ९७.६२ टक्के
 

पुण्यातील घरांच्या किमतीपेक्षा पिंपरी-चिंचवडमध्ये निम्म्याने कमी दराने घरे उपलब्ध आहेत. पुण्यात घर खरेदी करणारा वर्ग उच्चभ्रू आहे; तर इकडे मध्यम व सामान्य लोकांचा ओढा दिसतो. पायाभूत सुविधाही पुण्यापेक्षा इकडे चांगल्या असल्याने इकडे घरांना मागणी आहे.
- अय्यूबखान पठाण, सहशहर अभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com