पालिकेनं डुक्कर पकडलं... कुणीच नाही पाहिलं

Pig
Pig

पुणे - योजना आखून तिचा निधी हडप करण्याचा ‘उद्योग’ महापालिकेतील अधिकाऱ्यांना कसा जमतो, याचा आणखी एक नमुना समोर आला आहे. डुक्कर पकडल्याच्या कागदोपत्री नोंदी दाखवून त्याचा निधी लाटल्याचे आढळून आले आहे. डुकरांचा वाढता उपद्रव रोखण्याच्‍या  नावाखाली गेल्या वर्षभरात ४८ लाख रुपयांची उधळपट्टी झाली आहे. भरीस भर म्हणजे, या योजनेचे यशापयश ठरण्याआधीच नव्याने ७३ लाख रुपयांची तरतूदही केली असून ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे.

‘ही योजना यशस्वी ठरली’, हे कागदोपत्री सिद्ध करण्यासाठी गेल्या वर्षभरात पाच हजार डुकरे पकडल्याचा हिशेब प्रशासनाने मांडला. विशेष म्हणजे, जेवढी तरतूद होती, बरोबर तेवढीच डुकरे ताब्यात घेतल्याचा ‘ताळमेळ’ही प्रशासनाने घातला आहे. 

शहर आणि उपनगरांमध्ये डुकरांची संख्या आणि लोकवस्तीतील वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्याचे पडसाद उमटले. हडपसरमधील वाढत्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक नाना भानगिरे यांनी क्षेत्रीय कार्यालयात डुक्कर सोडले होते. त्यानंतर अनेक नगरसेवकांनी ही समस्या सोडविण्याचा आग्रह धरला. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने डुकरे पकडण्याची योजना जाहीर करून त्यासाठी ४८ लाख रुपयेही दिले.

‘या कामासाठी नेमलेला ठेकेदार डुकरे पकडत आहे’, असेही सांगण्यात आले. प्रत्यक्षात शहराच्या एकाही भागामध्ये डुकरांचा उपद्रव कमी झाला नसल्याचे नागरिक आणि नगरसेवक मांडत राहिले. या योजनेचा कालवाधी संपून त्यासाठीचा निधी खर्च झाल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले. पण नेमकी किती डुकरे पकडली, ते मोजण्याची यंत्रणा काय आणि योजनेची परिणामकारकता याचे उत्तर मात्र सापडलेले नाही.

संपूर्ण हडपसर आणि आजूबाजूच्या परिसरात डुकरांनी लोकांना प्रचंड हैराण केले आहे. अनेकदा तक्रारी मांडूनही त्यावर कारवाई होत नाही. डुकरे पकडण्यात येत असल्याचे आकडे खोटे आहेत. केवळ पैशांची उधळपट्टी सुरू आहे.
- चेतन तुपे, विरोधी पक्षनेता, महापालिका

हडपसरमध्ये गल्लीबोळांतच काय, अगदी घरासमोरील अंगणातही डुक्‍कर येतात. त्यामुळे केवळ घाण होते असे नाही, तर लहान-मुलांच्या दृष्टीने डुकरांचा वावर असुरक्षित वाटतो. या भागात अनेक वर्षे ही समस्या असली तरी त्यांचा बंदोबस्त केला जात नाही.
- मंदा शिंदे, रहिवासी, हडपसर

‘‘लोकवस्तीत डुकरे फिरत असल्याच्या तक्रारी वाढल्याने ही योजना आखली आहे. त्याचे परिणाम दिसून येत आहेत. आजघडीला रोज सरासरी ६० डुकरे पकडण्यात येतात. ठेकेदाराच्या कामावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असते. सर्व भागांतील डुकरे ताब्यात घेण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या आहेत.’’
- डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्यप्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com