एका खुनाच्या तपासात दुसऱ्याचा उलगडा

एका खुनाच्या तपासात दुसऱ्याचा उलगडा

यवत - खुटबाव (ता. दौंड) येथील हनुमंत थोरात यांचा अपहरण करून पैशासाठी खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास लावताना यवत पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपींनी इतर दोघांच्या मदतीने केलेल्या आणखी एका खुनाची कबुली दिली. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी कर्जत (जि. नगर) तालुक्‍यात झालेल्या एका महिलेच्या खुनातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

हनुमंत थोरात (वय ४५) या व्यावसायिकाचा पैशांसाठी अपहरण करून खून झाला होता. या खूनप्रकरणी सूरज ऊर्फ पप्पू ओव्होळ आणि रावसाहेब फुलमाळी (दोघेही रा. श्रीगोंदा, जि. नगर) यांना यवत पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी २०१५ मध्ये कर्जत तालुक्‍यात केलेल्या खुनाची कबुली दिली. एका ३५ वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधांच्या संशयावरून गळा दाबून खून केल्याची कबुली त्यांनी दिली. तिचा मृतदेह करपडी (ता. कर्जत) गावच्या हद्दीत एका उसाच्या शेतात फेकून दिला होता. कर्जत पोलिस ठाण्यात ८ डिसेंबर २०१५ रोजी याबाबत अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खुनाचा तपास लावण्यात कर्जत पोलिसांना तीन वर्षांत यश आले नव्हते. या खुनाचा तपास लावण्यासोबतच त्यात सामील असलेल्या सोपान पाटील आव्हाड (रा. पेडगाव, ता. कर्जत, जि. नगर) व अशोक फुलमाळी (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव, जि. नगर) हे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. थोरात यांच्या खुनातील अशोक फुलमाळी याचा सोपान आव्हाड हा भाचा आहे. आव्हाड व फुलमाळी यांना कर्जत पोलिसांनी अटक केली, तर सूरज ओव्हाळ व रावसाहेब फुलमाळी हे थोरात खूनप्रकरणी यवत पोलिसांच्या ताब्यात आहेत.  पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांच्या पथकात सहायक फौजदार रमाकांत गवळी, महेश बनकर, संदीप कदम, गणेश पोटे यांचा सहभाग होता. 

पंधरा हजारांचे बक्षीस 
जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या पथकाचे कौतुक करून त्यांना दोन्ही तपासासाठी पंधरा-पंधरा हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com