फोटोमागील दागिन्याने लागला खुनाचा छडा 

- अनिल सावळे
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी एका तरुणाने त्याची आई, पत्नी आणि मुलीचा निर्दयपणे खून केला. त्याने हा गुन्हा लपविण्यासाठी चोरट्यांनी खून करून दागिने लुटल्याचा बनाव रचला. या "ट्रिपल मर्डर'च्या घटनेने पोलिसही सुन्न झाले. मात्र पोलिस तपासामध्ये घरातच फोटोमागे ठेवलेले दागिने सापडले आणि फिर्यादीच खुनी असल्याचे समोर आले. 

घोरपडी येथील उदयबाग परिसरातील चंपारत्न सोसायटी. चार ऑक्‍टोबर 2012 रोजी या सोसायटीत अगदी विपरीत घडलं. विश्‍वजित केरबा मसलकर या तरुणाने पोलिस कंट्रोल रूमला फोन केला. आई, पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा खून झाला आहे. कुटुंबातील तिघांचा खून करून चोरट्यांनी दागिने चोरून नेल्याचे त्याने सांगितले. खुनाची खबर मिळताच वानवडी येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक बाजीराव मोहिते, अजित खडके, सहायक निरीक्षक प्रसाद सणस, कर्मचारी संभाजी नाईक, यशवंत आंबरे, अविनाश मराठे, प्रसाद कुंभार, महेश पवार आदी स्टाफ तातडीने घटनास्थळी पोचला. फ्लॅटचा दरवाजा उघडताच आई शोभा मसलकर, पत्नी अर्चना आणि दीड वर्षाची मुलगी किमया रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. ते पाहून पोलिसही क्षणभर थबकले. 

मसलकर यांच्या शेजारीच राहणारे ज्येष्ठ नागरिक मधुसूदन कुलकर्णी हे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. कुलकर्णी हे रेल्वेत सर्व्हिसला होते. त्यांना अपत्य नव्हते. ते एकटेच असल्यामुळे शेजारी मसलकर यांच्या घरी जात असतं. कुलकर्णी यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घरातील सामानांची उलथापालथ झालेली होती. काही वस्तू चोरीस गेल्याचे दिसत होते. त्या तरुणाने वानवडी पोलिस ठाण्यात खून आणि दागिने चोरीस गेल्याची तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

वानवडी पोलिसांनी तपासाला सुरवात केली. पोलिसांनी त्या घरासह शेजारील घराचीही झडती घेतली. परंतु संशयास्पद काही आढळून आले नाही. विश्‍वजितने आई, पत्नी आणि मुलीचा खून केल्यानंतर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तो काही मित्रांशी मुद्दामहून भेटला. त्याने फिरून दोन- तीन तास घालवले. त्याने तक्रार दिली तेव्हा तपासावरील पोलिसांना त्याच्यावर थोडा संशय आला. परंतु ठोस पुरावा नव्हता. पोलिसांनी घराचा पुन्हा सर्च घेतला. त्या वेळी घरात भिंतीवरील फोटोच्या मागे दागिने लपवून ठेवल्याचे आढळले. पोलिसांचा संशय खरा ठरला. विश्‍वजितनेच पत्नी, आई आणि मुलीचा खून करून दागिने घरातच ठेवले होते. पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. 

विश्‍वजित मसलकर हा एका मॉलमध्ये कामाला होता. त्याचे तेथील एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. तो तिच्यासोबत लग्न करणार होता. परंतु तो विवाहित असल्यामुळे प्रेयसी लग्नाला नकार देत होती. प्रेयसीपेक्षा पत्नी सुंदर असूनही तो प्रेयसीच्या प्रेमात पडला होता. त्याला तिच्याशिवाय दुसरे काही सुचत नव्हते. काही झाले तरी तिच्यासोबतच लग्न करायचे, असे त्याने ठरवलं होतं. त्यातूनच हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. 

या खटल्याची सुनावणी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्यासमोर झाली. त्यांनी आरोपी विश्‍वजित मसलकर याला 31 ऑगस्ट 2016 रोजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. पोलिसांनी मधुसूदन कुलकर्णी यांचा जबाब, सीसी टीव्ही फुटेज आणि विश्‍वजितने दिलेली खोटी फिर्याद असे आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सरकारी पक्षाची बाजू भक्‍कमपणे मांडली. तत्कालीन पोलिस आयुक्‍त गुलाबराव पोळ आणि सहआयुक्‍त संजीवकुमार सिंघल यांच्या सूचनेनुसार वानवडी पोलिस ठाण्यातील पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक ब्रह्मदेव पांडे, हवालदार पंढरीनाथ पवार, पोपट घुले, शांताराम शेटे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रेयसीसाठी अख्खे कुटुंब संपविणाऱ्या विश्‍वजितच्या हाती पश्‍चात्ताप करण्याशिवाय काही उरलेले नव्हते.

पुणे

पुणे - पहिली मुलगी झाल्यानंतर पुन्हा मुलगी नको म्हणणारा समाज, मुलगी झाली तर तिला मारून तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारे...

04.12 AM

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सत्ताधारी भाजपने पहिले पाऊल टाकले...

03.24 AM

पुणे - पुणे कॅंटोन्मेट बोर्डाच्या हद्दीतील दोन प्रभागांतील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून...

03.12 AM