पत्नी, मुलींचा खून करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या 

deepak-hande
deepak-hande

पुणे - पत्नी आणि दोन मुलींचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने स्वतः आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कात्रज येथे टेल्को कॉलनीमध्ये पहाटे पाचच्या सुमारास घडलेला हा प्रकार सकाळी दहाच्या सुमारास शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली असून, कर्जबाजारी झाल्यामुळे हे कृत्य केल्याचे त्यात नमूद केले आहे. 

दीपक सखाहरी हांडे (वय 42) असे आत्महत्या केलेल्या कुटुंब प्रमुखाचे नाव आहे. त्यांनी त्यांची पत्नी स्वाती (वय 35), मुलगी तेजस (वय 16) आणि वैष्णवी (वय 12, सर्व रा. टेल्को कॉलनी, गल्ली क्रमांक 8, दत्तनगर, कात्रज) यांचा खून केल्याचे पोलिसांच्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. हांडे हे मूळचे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यामधील वनकुडे गावचे रहिवासी होते. ते संत तुकाराम साखर कारखान्याच्या शेती विभागात नोकरीस होते. नोकरी लागल्यापासून 22 वर्षे ते पुण्यात वास्तव्यास होते. हांडे यांची मोठी मुलगी तेजस ही कात्रज येथील हुजूरपागा माध्यमिक विद्यालयामध्ये दहावीमध्ये शिकत होती, तर वैष्णवी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचवीमध्ये शिकत होती. दोघीही अभ्यासात हुशार होत्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यांच्या शेजारी त्यांचा सख्खा भाऊ राहण्यास आहे. दोघांनी मिळून हे घर बांधलेले आहे. तळमजल्यावर भाडेकरू राहण्यास आहेत, तर वरील मजल्यावर दोघे भाऊ वेगवेगळ्या घरात राहतात. दीपक यांच्यावर 64 हजारांचे कर्ज होते. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये हांडे यांनी स्वत:च्या मृत्यूला कोणालाच जबाबदार धरू नये, असे लिहून ठेवले आहे. दीपक यांनी उसने पैसे घेतलेल्यांची नावे लिहून ठेवलेली डायरीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

हांडे यांनी पहाटे पाचच्या सुमारास खून करण्यापूर्वी स्वाती, तेजस आणि वैष्णवीच्या हातामध्ये शंभर रुपयांची नोट ठेवली. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावले. बेडरूममध्ये झोपलेल्या पत्नी स्वाती व मुलगी वैष्णवी हिचा गळा आवळून खून केला. त्यांनतर हॉलमध्ये झोपलेल्या तेजसचा खून केला. नंतर दोरीच्या साहाय्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. 

घराचा दरवाजा सकाळी उशिरापर्यंत न उघडल्याने नातेवाइकांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने हांडे यांच्या भावाने खिडकीची काच फोडून आतमध्ये पाहिले. तेव्हा त्यांना दीपक यांचा मृतदेह हॉलमध्ये दिसला. त्यांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड, सहायक निरीक्षक अमोल काळे, उपनिरीक्षक समाधान कदम यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. दरवाजा तोडून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला. पंचनामा करून सर्व मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. अधिक तपास सहायक निरीक्षक काळे करीत आहेत. 

मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये 
""आमचं जीवन एवढंच आहे. यापुढे आम्हाला जीवन नाही. आम्ही जातोय. आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,'' असे आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीमध्ये दीपक यांनी लिहून ठेवले आहे. या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. घटनेची बातमी परिसरात झपाट्याने पसरली. त्यानंतर टेल्को कॉलनीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com