पाळणाघराला नियमावली हवी 

Day Care Center
Day Care Center

पुणे : नोकरी करणाऱ्या आई-बाबांच्या संस्कारक्षम वयातील मुलांचं दुसरं घर म्हणजे "पाळणाघर' (आधुनिक भाषेतलं "डे केअर सेंटर'). आपल्या जीवाचा तुकडा मोठ्या विश्‍वासाने आई काही तासांकरिता दुसऱ्याला सांभाळण्यासाठी देते, तेव्हा तिला हवा असतो, तो आपल्या बाळाची योग्य काळजी घेतला जाईल, असा विश्‍वास. हाच विश्‍वास कायमस्वरूपी राहावा, ही माफक अपेक्षा सर्व पालकांची आहे; परंतु आता त्याबरोबरच पाळणाघरात सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, त्या कॅमेऱ्यांतील फुटेज पाहण्याची सुलभ सोय हवी, प्रशिक्षित मावशा आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी व्हावी, पाळणाघराची नियमावली असावी, अशा मागण्या होऊ लागल्या आहेत. 

मुंबई येथील खारघरमधील पाळणाघरात महिलेने (आया) एका बालिकेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच राज्यातील बहुतांश पाळणाघरांमधील फोन खणखणू लागले. पुण्यातील पाळणाघरांची स्थितीदेखील यापेक्षा काही वेगळी नव्हती. खारघरमधील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर "आपलं मूल पाळणाघरात सुरक्षित राहील ना' अशी विचारणा पुरेशी खात्री होईपर्यंत होत होती, असा अनुभव पुण्यातील पाळणाघर चालविणाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितला. एरवी मुलं पाळणाघरात सोडताना निर्धास्त असणाऱ्या पालकांच्या मनातही चिंतेचा कल्लोळ माजल्याचे शुक्रवारी दिसून आले. 

पाळणाघरात हवेत सीसीटीव्ही कॅमेरे... 
आयटी कंपनीत काम करणारी दीपश्री आपटे म्हणाली, ""पाळणा घरासंदर्भातील माझा अनुभव तरी चांगला आहे. त्या पाळणाघरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मुलांची योग्य काळजी घेतली जाते. वेळच्या वेळी जेवण, इतर कलागुणांना वाव दिला जातो. सकाळचा नाश्‍ता, जेवण यांचे वेळापत्रक सांगितले जाते. मुलांची अधूनमधून चौकशी करण्याची जबाबदारी मात्र पालकांची आहे.'' खरंतर मुलांच्या वागणुकीवरून पाळणाघरात त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, घेतली जाणारी काळजी याबद्दल अंदाज येऊ शकतो. त्यामुळे मुलांच्या हालचालींवर पालकांनीही बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्ला समुपदेशक देत आहेत. 

शिक्षिका असणारी श्रुती राघवते म्हणाल्या, ""एक-दोन वर्षांपासून मी माझ्या मुलाला पाळणाघरात ठेवत आहे. तेथील जेवण उत्तम आहे, तिला खूप चांगल्या सवयी लावल्या जात आहेत. मुलांना शिस्तपण लावली जाते. खरंतर आपली मुलं कोणाच्या तरी हातात सुरक्षित आहेत, असा विश्‍वास वाटतो; पण प्रत्येक पाळणाघरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, असे निश्‍चितच वाटते. आणि त्या कॅमेऱ्यांचे फुटेज मागणीनुसार दाखविण्याची सोय हवी. तसेच पाळणाघरांमध्ये व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग यासारखे पर्यायही वापरता येतील. पाळणाघरातील महिला कर्मचाऱ्यांची मानसिक तपासणी करणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणेही महत्त्वाचे आहे.'' 

पाळणाघरातील कर्मचाऱ्यांना गरज प्रशिक्षणाची 
खारघरमधील पाळणाघरात झालेल्या गैरप्रकारानंतर शहरातील अनेक पाळणाघरांमध्ये तातडीच्या बैठका बोलाविण्यात आल्याचे दिसून आले. "आपल्याकडे असे प्रकार होऊ नयेत, म्हणून घ्यायची काळजी, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. "आजोळ' पाळणाघराच्या संचालिका मोनिका कुलकर्णी म्हणाल्या, ""एका पाळणाघरात गैरप्रकार झाल्यामुळे सगळ्या पालकांनी घाबरून जायचे कारण नाही; परंतु आता प्रत्येक पाळणाघरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करणे आवश्‍यक आहे, हे मात्र खरे. तसेच कॅमेऱ्यातील फुटेज सांभाळण्यासाठी कोणी तरी असणे अपेक्षित असून, हे फुटेज पालकांच्या मागणीनुसार त्यांना दाखविण्यात यावे. खरंतर पाळणाघरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले पाहिजे आणि त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. आमच्या पाळणाघरात आम्ही कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक माहिती ठेवतो, त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देतो आणि त्यांचे समुपदेशनही करतो. खरंतर पाळणाघरातील कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी ठोस अशी नियमावली असणे अपेक्षित आहे.'' 

बिबवेवाडी येथील "गार्गीज्‌ फन वर्ल्ड'च्या प्रमुख प्राजक्ता कोळपकर म्हणाल्या, ""पाळणाघरात मावशांची नियुक्ती करताना आम्ही विशेष काळजी घेतो. यापूर्वी मी आरोग्य तपासणी करूनच मावशांची नियुक्त करायच; परंतु आता मानसिक आरोग्याची तपासणी करणेही, मला महत्त्वाचे वाटते. आपले बाळ सुरक्षित हातात आहे, अशी विश्‍वास पालकांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो; परंतु शितावरून भाताची परीक्षा करू नये, असे वाटते.'' 

सरकारने काय करणं अपेक्षित :- 
- स्वतंत्र आणि प्रभावी नियमावली हवी 
- पाळणाघर चालविणाऱ्यांसाठी हवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम 
- कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी असावा कार्यक्रम 
- पाळणाघरांसाठी परवाना आवश्‍यक 

"पाळणाघर'त ही काळजी घ्यावी 
- सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत 
- काम करणाऱ्यांची मानसिक आरोग्य तपासणी गरजेची 
- व्हिडिओ कॉलिंग किंवा चॅटिंगची हवी सोय 
- मुलांचे अपटेड पालकांना सातत्याने पाठवावेत. 

महिला व बालविकास विभागाचा हवा अंकुश 
पाळणाघरांवर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याकडे परिपक्व नियमावलीचा अभाव असल्याचे निदर्शनास येते. अर्थात, प्रत्येक गोष्टीला चांगले-वाईट, योग्य-अयोग्य असे अनेक कंगोरे असतात. "पाळणाघरा'च्या बाबतीतही अगदी तसेच असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही; परंतु "महिला व बालविकास विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. महिला व बालविकास विभागाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत दर तीन महिन्यांनी पाळणाघरांची तपासणी होणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com