नगर परिषदांचा आज फैसला

बारामती - येथील कसब्यातील मतदान केंद्रावर बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मतदारांच्या लागलेल्या रांगा.
बारामती - येथील कसब्यातील मतदान केंद्रावर बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मतदारांच्या लागलेल्या रांगा.

पुणे - जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या नगराध्यक्ष आणि २२३ नगरसेवकपदांसाठी बुधवारी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. दहा नगराध्यक्षांसह नगरसेवकपदांच्या सर्व जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ८९४ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. बारामती व जुन्नरमध्ये चिठ्ठ्या दिलेले मतदारांचे सायंकाळी साडेपाचनंतरही मतदान सुरू होते. 

दरम्यान, नगर परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार, याचा निकाल उद्या (गुरुवारी) लागणार आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

मतमोजणी गुरुवारी संबंधित नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातच केली जाणार आहे. मतदानयंत्रांमुळे पहिला निकाल सकाळी अकराला हाती येईल, अशी शक्‍यता नगरपालिका निवडणूक शाखेने वर्तविली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण तेरा नगर परिषदा आहेत. त्यापैकी चाकण आणि राजगुरुनगर या दोन नगर परिषदा नव्यानेच स्थापन झालेल्या असून, त्यांची पहिली निवडणूक याआधीच घेण्यात आली आहे. भोर नगर परिषदेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. उर्वरित दहा नगर परिषदांसाठी बुधवारी मतदान झाले. यामध्ये बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड, सासवड, जेजुरी, जुन्नर, आळंदी, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे यांचा समावेश आहे. 

सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत मतदारांचा फारसा उत्साह दिसत नव्हता. जेमतेम १५ टक्केच मतदान पहिल्या दोन तासांत झाले. दुपारपर्यंत मतदारांचा निरुत्साहच जाणवत होता. दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागण्यास सुरवात झाली आणि मतदानाची टक्केवारी वाढू लागली. दौंड, बारामती, इंदापूर आदी ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

सकाळपासून दुपारी दोनपर्यंत इंदापूर, बारामती, दौंड शहरांत रिमझिम पाऊस झाला. दरम्यान, बारामती, दौंड, सासवड, जुन्नर, तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि इंदापूर या सात नगर परिषदांसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले. यामुळे या ठिकाणी अनपेक्षित निकाल लागण्याची शक्‍यता जाणकारांनी वर्तविली आहे. 

बारामतीत शांततेत मतदान
बारामती : बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी बुधवारी शांततेत मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश देशमुख व अमर पाटील यांनी सांगितले. बुधवारी सकाळी साडेसातला मतदानास प्रारंभ झाला. तेव्हा मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. उमेदवार व समर्थकांनी सकाळी लवकर मतदान उरकून घेतले. नगराध्यक्षपदासाठी नशीब आजमावत असलेल्या पौर्णिमा तावरे, सुनील पोटे आदींनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीडपर्यंत सरासरी ३५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

सकाळपासून बारामतीत पावसाची भुरभुर सुरू होती. सकाळच्या थंड वातावरणाचाही मतदानाच्या टक्केवारी काहीसा परिणाम झाल्याचे जाणवले. पाऊस थांबल्यानंतर मतदानाला जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतल्याने दुपारनंतर हळूहळू अनेक ठिकाणी मतदानाने वेग घेतला होता. काही मतदान केंद्रावर उमेदवार किंवा त्यांचे समर्थक यांच्यात काही वेळा शाब्दिक चकमकी झाल्या. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर सर्वांनाच मतदान केंद्राबाहेर थांबण्याच्या सूचना दिल्या गेल्या. अनेक मतदान केंद्रांवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. आज उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून मतदारांना घरातून बाहेर काढत मतदान केंद्रापर्यंत आणून मतदानाचा टक्का वाढविण्याचे प्रचंड प्रयत्न सुरू असल्याचे प्रत्येक प्रभागात दिसले. 

शेवटच्या टप्प्यात गर्दी
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शेकडो बारामतीकरांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचे चित्र आज नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पाहायला मिळाले. संध्याकाळी पाचपर्यंत अनेक मतदार घराबाहेरच पडले नव्हते. संध्याकाळी मात्र उमेदवार व समर्थकांनी जोर लावल्यानंतर शहरातील बहुसंख्य मतदान केंद्रांबाहेर गर्दी उसळली. 

निवडणूक यंत्रणेने साडेपाच वाजता रांगेमध्ये उभ्या राहिलेल्या शेवटच्या मतदाराला एक क्रमांकाची चिठ्ठी दिली व तेथून पुढे मतदान केंद्राबाहेरील मतदारांपर्यंत प्रत्येकाला चिठ्ठी देत त्यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. कसब्यामध्ये काशीविश्‍वेश्‍वर मंदिराबाहेर, बालकमंदिर, म.ए.सो. विद्यालय, सिद्धेश्‍वर गल्लीतील शाळांबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या.

बालकमंदिरामध्ये बनावट मतदानाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर वातावरण निवळले. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना आणून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करताना दिसले.

शहरात वाहतूक कोंडी
शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर वाहतुकीची अनेकदा कोंडी झाली. सरकारी वाहने तसेच पावसामुळे लोकांनी चारचाकी वाहने रस्त्यावर आणल्याने आणि रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी अस्ताव्यस्त लावून ठेवलेल्या असल्याने ही कोंडी झाली. पोलिस निवडणूक बंदोबस्तात असल्याने हो कोंडी अखेर लोकांनीच दूर केली. 

मतदानानंतरही सेल्फी
अनेक कुटुंबीयांनी एकत्र येत मतदान केले. मतदानानंतर आपला सेल्फी काढून तो सोशल मीडियावर टाकला. मतदानाचा पहिल्यांदा हक्क बजावलेल्या युवकांनी जीवनात प्रथम मतदान केल्याचा आनंद व्यक्त केला. मतदान तुम्हालाच केले आहे पण पुढची पाच वर्षे आमच्याकडे लक्ष द्या असे सूचक वक्तव्य काही मतदारांनी उमेदवारांना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com