नगर रस्त्यावर मेट्रोसाठी प्रशासनाची सकारात्मकता

Metro
Metro

पुणे - नगर रस्त्यावर मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण करण्याच्या प्रस्तावावर महापालिकेच्या प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सर्वंकष वाहतूक आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर याचा विचार करता येईल, असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे.

मेट्रोचा वनाज ते रामवाडी हा प्रस्तावित मार्ग असून, या मार्गावर सध्या काम सुरू झाले आहे. मेट्रोच्या या मार्गाचे नगर रस्त्यावर वाघोलीपर्यंत व रामवाडी ते विमानतळापर्यंत विस्तारीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी गेल्या महिन्यात केली होती. या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष योगेश मुळीक यांनी आयत्या वेळी हा विषय दाखल करून या दोन्ही कामांचा प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यास मंजुरी घेतली. यामुळे नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गाचे श्रेय मिळविण्याची स्पर्धा नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे.

जून महिन्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या मार्गाचा विस्तार विमानतळ आणि नगर रस्त्यावर चंदननगरपर्यंत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नगरसेवक टिंगरे यांनी या मार्गाचा वाघोलीपर्यंत विस्तार करण्याची मागणी करण्याचे पत्र स्थायी समितीला दिले होते. त्या वेळी स्थायी समितीने या संदर्भात प्रशासनाकडून अभिप्राय मागविला होता. पीएमआरडीए त्यांच्या हद्दीतील वाहतूक आराखडा तयार करीत आहे. मेट्रोसाठी जमिनीची उपलब्धता, आर्थिक गुंतवणूक पर्याय, वाहतूकविषयक अभ्यास, प्रवाशांची संख्या, मार्गाची व्यवहार्यता आदीचा अभ्यास करून आराखड्यात त्याचा समावेश केला तर सोयीचे
होईल. आराखडा मान्य झाल्यानंतर या मार्गाच्या विस्तारीकरणाचा विचार करता येईल, असे प्रशासनाने अभिप्रायात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com