बैलाच्या दशक्रियेत अनेक जण हळहळले...

बैलाच्या दशक्रियेत अनेक जण हळहळले...
बैलाच्या दशक्रियेत अनेक जण हळहळले...

दशक्रियेत काकस्पर्शही झाला त्वरीत

कोरेगाव भीमा (ता. शिरूर, पुणे) : घाटातील ‘फायनल सम्राट’ म्हणून पंचक्रोशीत नावलौकीक मिळवून देणाऱ्या ‘नाग्या’ बैलाला कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गव्हाणे कुटूंबाने घरातील कुटूंबाचा सदस्य मानत इतरांसमोर एक चांगला आदर्श ठेवला होता. हे अनोखे नाते जपत गव्हाणे कुटूंबाने ‘नाग्या’ बैलाच्या निधनानंतर मंगळवारी (ता. 11) घातलेल्या दशक्रिया विधीत काकस्पर्श झाल्याक्षणी गव्हाणे कुटूंबासह अनेकांना अश्रू अनावर झाले.

आपला देश कृषिप्रधान असल्याने शेतीला तसेच शेतात मशागतीसाठी पाळल्या जाणाऱ्या बैलांना अनन्यसाधारण महत्व असून, अनेक ठिकाणी कुटूंबातील सदस्यांप्रमाणेही त्यांना महत्त्व दिले जाते. महाराष्ट्रात यात्रा-जत्रांच्या काळात बैलगाडा शर्यतीच्या परंपरेमुळे बैलगाडा शौकीन बैलांना स्वत:च्या मुलांप्रमाणे जीव लावून घरातील सदस्य समजतात. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक राजाराम गव्हाणे व विश्वास गव्हाणे या बंधूंना बैलगाड्यांचा छंद आहे. गव्हाणे बंधूंनी दहा वर्षांपूर्वी लोणीकंद येथील पांजरपोळ संस्थेतून ‘नाग्या’ नावाचा बैल आणला होता. कुटूंबातील घटक बनलेल्या या बैलाला आपल्या मुलांप्रमाणे सांभाळत त्यांनी उत्तम आहार देवून घाटात पळण्यायोग्य बनवला. त्यामुळे ‘नाग्या’ने शिरुर-हवेलीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘फायनल सम्राट’ म्हणून विजय मिळवत गव्हाणे कुटूंबाला प्रसिध्दी मिळवून दिली होती. मात्र, वयोमानाने पाच एप्रिलला त्याचे निधन झाल्याने जड अंतकरणाने गव्हाणे कुटूंबाने नाग्या बैलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. एवढेच नव्हे तर कूटूंबातील सदस्याप्रमाणे १० दिवस दुखावटा पाळत नाग्या बैलाचा दशक्रिया विधीही करुन त्याच्याविषयी असलेला जिव्हाळा जपला. नाग्या बैलाच्या दशक्रिया विधीत प्रवचन ठेवून अनेकांनी श्रद्धांजलीही वाहिली.

या दशक्रियाला राष्ट्रवादीचे नारायणराव फडतरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, सरपंच सौ. संगीता कांबळे, उपसरपंच सौ. वृषाली गव्हाणे, माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उत्तम गव्हाणे, नामदेव दरेकर, कचरू मारुती ढेरंगे, किरण सव्वाशे, संभाजी गव्हाणे, प्रदीप काशीद, स्वप्नील गव्हाणे, अनिल काशिद, रामदास गव्हाणे, कांताराम कडलग, खंडू चकोर, बैलगाडा शर्यतीचे निवेदक पंडित गोसावी, बापू भंडारे, देवराम दरेकर, शरद दरेकर, शिवाजी दरेकर तसेच अनेक बैलगाडा मालक, टेम्पो चालक उपस्थित होते. यावेळी ‘पेटा’ संस्थेने बैलगाडा शर्यतीविरोधात लावलेली केस मागे घेऊन सरकारने बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात, अशीही मागणी एकजुटीने करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com