एकेक दिवा सदा तेवत राहावा म्हणून....

नंदकुमार सुतार
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

समाजातील अन्य मंडळी - संस्थादेखील यातून प्रेरणा घेऊन पुढे येतील आणि अशा मुलांच्या डोळ्यांतील आशेची ज्योत कायम प्रज्ज्वलित राहण्यासाठी निश्‍चितपणे योगदान देतील. प्रकाशाचा उत्सव असणाऱ्या दिवाळी सणाचे स्वागत करताना यापेक्षा आणखी कोणते योगदान मोठे असेल?

पुणे - अनाथ विनिताच्या जीवन संघर्षाची कहाणी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच, सारेजण हळहळले. अनेक जण तिच्या मदतीसाठी पुढे आले. काहींनी त्याच दिवशी थेट "सकाळ' कार्यालय गाठले आणि वित्तीय मदत देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. संकटाचे वारे कितीही घोंघावले तरी अशा स्वप्रकाशित पणत्या कायम तेवत राहाव्यात म्हणून तळमळीने पुढे येणारे असंख्य पुणेकर या शहरात आहेत, हे यानिमित्ताने समाजासमोर आले आहे. हे अधोरेखित करणारे आणखी एक कारण घडले, श्री गणेश कृपेकरून! पुण्यातील गणेश मंडळांनी मदतीचा हात पुढे केल्याने.

पुण्यातील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक दरवर्षी उत्सवाच्या काही दिवस आधी "सकाळ'च्या व्यासपीठावर होत असते. उत्सवाच्या चर्चेसोबतच, आपण करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोचण्यासाठी यासारखे दुसरे व्यासपीठ ते कोणते, या भावनेतून मंडळांचे पदाधिकारी बैठकीत खूप तळमळीने बोलतात. माहितीची देवाण-घेवाण करतात. चांगल्या कामांचे इतरांनी अनुकरण करावे यासाठी आग्रह धरतात. प्रत्येकाचे त्यांच्या पातळीवर छोटे-मोठे सामाजिक काम चाललेलेच असते. तसेच सर्वजण मिळून काय करता येईल यावरही चर्चा होत असते. या वेळी झालेल्या बैठकीत बुद्धीचे दैवत गणेशाची खऱ्या अर्थाने उपासना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन रात्रशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्येची उपासना चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी मदत देण्याचा निर्णय झाला. काही मंडळांनी बैठकीतच मदत जाहीर केली, तर काहींनी नंतर घोषणा करून मदतीचे धनादेश देऊन टाकले.

जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यांना एका साध्या कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आली. सरस्वती मंदिर संस्थेच्या बाजीराव रस्त्यावरील शाळेमध्ये सायंकाळच्या सुमारास कार्यक्रम झाला. पुण्यातील रात्रशाळा आणि महाविद्यालयांमध्ये हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचा वयोगट चौदा वर्षांपासून ते पन्नाशीपर्यंत आहे. किशोरवयीन मुलांची संख्या खूप आहे. ते खूप मेहनत घेत शिकत आहेत. दिवसभर पडेल ती कामे करायची आणि रात्री या शाळेमध्ये शिक्षण घ्यायचे. या प्रत्येक मुलाचा संघर्ष म्हणजे एक करुण कहाणी आहे आणि यशोकथादेखील.
आठवीच्या वर्गात शिकणारा एक मुलगा कोंढव्यातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये साफसफाईची कामे करतो आणि सरस्वती मंदिराच्या रात्रशाळेमध्ये शिकतो. ना राहायची व्यवस्था, ना खाण्यापिण्याची सोय. पण लढतोय परिस्थितीशी. रोजच संघर्ष. आई - वडील गावाकडे शेतमजुरीचे काम करतात. त्यांचेच भागत नाही; म्हणून हा आला पुण्यात शिक्षण घ्यायला आणि दुनियादारीही शिकायला.

सोळा वर्षांची एक मुलगी दिवसभर धुणी-भांडी करते आणि रात्री शिक्षण. अनेक अडचणी आल्या; परंतु शिक्षणाचा ध्यास नाही सोडला. पालक आणि बहिणींसमवेत पाच बाय पाचच्या खोलीत राहते. कामातून जरा उसंत मिळाली की पुस्तके असतातच साथीला.

पिकांवर विषारी कीटकनाशके फवारताना अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. त्यामुळे बळिराजा आणि समाजमन चिंतित झाले आहे. कारण कीटकनाशकांच्या पिकावरील फवारणीमुळे एवढ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू यापूर्वी कधी झाले नव्हते. पण हा प्रश्‍न तसा खूप जुना आहे. त्याच्या झळा रात्रशाळेतील एक पंधरा वर्षांचा मुलगा भोगतो आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वीची घटना. त्याचे वडील शेतात फवारणी करत असताना वाऱ्यामुळे अत्यल्प अंश डोळ्यांमध्ये गेला. किती उपचार केले तरी काही फायदा नाही झाला. त्यांना कायमचे अंधत्व आले. एकट्या आईच्या काबाडकष्टावर सर्वांचे भागत नाही म्हणून या मुलाने पुण्याचा रस्ता धरला. तो दिवसभर हॉटेलमध्ये काम करतो आणि रात्रशाळेत शिकतो. शिक्षणातही तो चमकदार कामगिरी करत आहे.

या विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात अशा संघर्षकथा समोर आल्या. त्यांच्या साऱ्या आशा या पुण्यावर आहेत. हे शहर आपणाला रोजीरोटी तर देईलच, शिवाय शिक्षण देईल आणि मोठे होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देईल, अशी आशा त्यांच्या डोळ्यांत दिसते. या कहाण्या आहेत जिद्दीच्या आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या. खूप संकटे येत असली, तरी ही मुले शिक्षणाची कास सोडत नाहीत. त्यांच्या मनातील हीच आस कायम तेवत ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी गणेश मंडळे पुढे आली, त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभारदेखील. उर्वरित मंडळेदेखील हात पुढे करतील, समाजातील अन्य मंडळी - संस्थादेखील यातून प्रेरणा घेऊन पुढे येतील आणि अशा मुलांच्या डोळ्यांतील आशेची ज्योत कायम प्रज्ज्वलित राहण्यासाठी निश्‍चितपणे योगदान देतील. प्रकाशाचा उत्सव असणाऱ्या दिवाळी सणाचे स्वागत करताना यापेक्षा आणखी कोणते योगदान मोठे असेल?