पर्यटकांना खुणावतोय आंदर मावळातील निसर्ग

रामदास वाडेकर
बुधवार, 12 जुलै 2017

माऊपासून खांडीपर्यत आणि दुसरीकडे निगडे पासून सावळा कळकराई मेटलवाडी पर्यतच्या डोंगरावरून वाहणारे धबधबे म्हणजे वर्षाविहारात भिजण्याची मोठी पर्वणी आहे. मात्र येथे भिजताना सावधानता बाळगावी, धबधब्या पर्यत जाताना वाढलेल्या गवतात विंचू,साप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा धबधब्याच्या पाण्यातून एखादा दगड पडू शकतो.

टाकवे बुद्रुक : आंदर मावळात कृषी पर्यटन वाढीला मोठा वाव आहे, या अनुषंगाने येथील विकासाला चालना मिळाली पाहिजे. टाटांच्या ठोकळवाडीचे व शासनाच्या आंद्रा धरणाचे विस्तीर्ण पसरलेले अथांग पाणी, सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून खळळून वाहणारे धबधबे, सभोवतालीची हिरवीगार वनराई, अभंगाच्या ओव्या गात माऊली व तुकोबारायांच्या ओढीने गेलेली पवित्र इंद्रायणी हे येथील वैभव आहे.

आयुष्याच्या चढउतार आणि धकाधकीच्या जीवनात थोडसा आनंद वाटयला यावा म्हणून हजारो पर्यटकांची पावले या निसर्गाच्या ओढीने धावत आहेत. विकेंडला लोणावळा खंडाळा प्रमाणे या परिसरातील गर्दी वाढू लागली आहे. मुळाच निसर्गाच्या मुक्तहस्त उधळणीने हा परिसर पर्यटकांना खुणावत आहे. आंदर मावळाच्या प्रवेशद्वारा वरच आळंदी व देहूकडे प्रस्थान करणारी इंद्रायणी हस्तमुखाने सर्वाचे स्वागत करते. खांडी व सावळा मार्गे जाणारे पर्यटक वर्षाविहाराचा आनंद लुटत आहे. वेडीवाकडी वळणे व चढउताराच्या रस्यावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बळिराजांची भात लावणी सुरू आहे. औतावर बृषभाला घातलेली  साद ऐकताना वेगळाच अनुभव अनुभवता येतो.

कोंडिवडेत आंद्रा तीरावर वसलेले सुंदर फार्म हाऊसे सर्वाच्या नजरा खिळून ठेवते,आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपललेही सुंदर फार्म हाऊस असावे हे सुंदर स्वप्न तरळू लागते.अशीच वेगवेगळी फार्म हाऊसे न्याहाळित पुढे गेल्यावर सावळयावरून खांडी मार्गाने पुढे येता येते. या मार्गावरील  निळशी व कांब्रेतील खाजगी पिकनिक कॅम्स डोळयाला भुरळ पाडते.डाहूलीत सह्याद्रीच्या अवघड कड्यावर जाणारा ट्रेकिंग पाॅईट गिर्यारोहकांना खुणावतोय.

माऊपासून खांडीपर्यत आणि दुसरीकडे निगडे पासून सावळा कळकराई मेटलवाडी पर्यतच्या डोंगरावरून वाहणारे धबधबे म्हणजे वर्षाविहारात भिजण्याची मोठी पर्वणी आहे. मात्र येथे भिजताना सावधानता बाळगावी, धबधब्या पर्यत जाताना वाढलेल्या गवतात विंचू,साप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा धबधब्याच्या पाण्यातून एखादा दगड पडू शकतो. वळणाच्या रस्त्यावरून जाताना विरूद्ध दिशेने आलेले वाहन दिसत नसल्याने वाहने जपून चालवावी. 

बोरवली, डाहूली, लालवाडी, बेंदेवाडी, कुसूर, सावळा आदी गावात घरगुती पद्धतीच्या शाकाहारी व मासांहारी जेवणाची सोय आहे, चुलीवर केलेल्या रूचकर भोजनाचा स्वाद वेगळाच येतो. वडेश्वर, टाकवे बुद्रुक, भोयरेतील चहा नाश्ताची हाॅटेल्स आहे. पावसाळयात या परिसरात पर्यटकांची गर्दी होत असते,त्यामुळे येथे कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे.राहण्याची,जेवणाची उत्तम सोय केल्यास पुणे व मुंबई सह परिसरातील शहरातून पर्यटकांचा कल निश्चित वाढू लागले. धबधब्यातून धरणाच्या दिशेने वाहत्या पाण्यात सिमेंट च्या पाय-या बांधल्यास त्या पाण्यात झिंब भिजता येईल.ओढयावर बाधरे बांधून ते पाणी अडविणे शक्य आहे. 

पर्यटन विकास वाढीसाठी जे प्रयत्न शक्य आहे, त्यास प्रोत्साहन दिल्यास दुचाकी चारचाकी वाहने पार्किंग सर्व्हिस, कॅम्स मध्ये,हाॅटेल्स, घरगुती खानावळी यात वाढ होऊन स्थानिकांना रोजगार मिळतील.या शिवाय या परिसरातील ग्रामपंचायतीने स्वच्छता कर आकारल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.