#NavDurga वंचितांना अभिजात संगीताची अपूर्व अनुभूती

Dakshayani-Athalye
Dakshayani-Athalye

बांधकाम मजूर व महापालिकेच्या शाळांमधील मुलामुलींना भारतीय अभिजात संगीतातून मिळणारा अवर्णनीय आनंद हाच मोठा मौल्यवान खाऊ असतो. तो दाक्षायणी आठल्ये वेळोवेळी अशा ठिकाणी जाऊन पुरवतात.

कर्णकर्कश ध्वनी म्हणजेच काय तो करमणुकीचा घटक, अशी धारणा समाजातील अनेकांची झालेली असते. त्यातून वंचितांकडे तर याबाबतीत पर्याय शोधायला पुरेसे स्रोतही उपलब्ध नसतात. अशांना भारतीय रागसंगीतामुळे मनात उठणाऱ्या हव्याहव्याशा भावतरंगांची सुगम्य ओळख दाक्षायणी आठल्ये ही तरुणी करून देते. तिच्या ‘बैठक’ या संस्थेच्या अभिनव उपक्रमांबद्दल समाज माध्यमांतून कळणारे नवनवे प्रयोग थक्क करतात. 

याबाबात बोलताना दाक्षायणी म्हणाली, ‘‘समाजातील संवेदनशीलता कमी होते आहे. करमणुकीसाठी आरडाओरडाच आढळतो. अभिजात कलांचा परिणाम मनाला उन्नत करणारा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या वंचित वस्त्यांमध्ये करमणुकीसाठी आरडाओरडाच जास्त जाणवतो. त्यामुळे येणारी बधिरता, आक्रमकता त्यांच्या लक्षात येत नाही. इंग्रजी व विज्ञान या विषयाबद्दल जागरूकता वाढत चालली, मात्र मनाला आराम वाटेल यासाठीचे उत्तम मार्ग या मंडळींना माहीत नाहीत. ते यांच्या लक्षात आणण्यासाठी आपल्या परिचयाचं रागसंगीत उपयोगात आणूया, असं मी आणि माझ्या नवऱ्यानं (मंदार कारंजकर) ठरवलं.’’

‘‘मी मूळची रत्नागिरीची. इयत्ता पाचवीपासून कीर्तन करत आले आहे. रागसंगीताची बैठक त्यामुळेच मनात होती. शिक्षणासाठी पुण्यात आले. 

नंतर इथंच विधायक कामांची संधी मिळाली. विधी महाविद्यालय आणि नंतर सामाजिक शास्त्राचं शिक्षण घेताना काही सामाजिक संस्थांबरोबर काम केलं. तेव्हा मला शिकवायला आवडतंय हे लक्षात आलं. सुरवातीला आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांना इंग्रजी शिकवायचे. या मुलांना एकूणच उन्नतीकडे नेण्यासाठी काय काय करता येईल, याचा शोध सुरू होता,’’ असे त्या नमूद करतात.

‘‘सुरवातीला खराडीतल्या वस्तीतील विकास केंद्रावर रागसंगीताच्या ध्वनिफिती, ध्वनिचित्रफितींच्या आधारे तिथल्या लहानमोठ्यांना अभिजात संगीताची ओळख करून द्यायचो. मुलांना ते आवडतंय हे समजताच अधिकाधिक वंचितांपर्यंत या कामाचा विस्तार केला. सध्या बांधकामाच्या चार ठिकाणी व महापालिका संचालित काही शाळांमध्ये आम्ही गायक-वादक-नर्तक कलावंतांना घेऊन जातो. ते कला सादर करतात. त्याबद्दल बोलतात. याचबरोबर प्राचीन दगडी मंदिरामध्ये कुठलीही कृत्रिम ध्वनियंत्रणा न वापरता अभिजात संगीताच्या बैठकी आम्ही आयोजित करतो. शालेय पातळीवर मुलांना अभिजात संगीताची गोडी लावण्यासाठी रोचक पुस्तकनिर्मितीचीही धडपड चाललेली आहे,’’ असेही दाक्षायणीने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com