नयना पुजारी खून; माफीच्या साक्षीदाराची साक्ष महत्त्वाची

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

पुणे - नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्यात माफीचा साक्षीदार झालेला राजेश चौधरी यानेच आरोपी आणि पुजारी यांना शेवटी एकत्रितपणे पाहिले होते. त्यामुळे त्याची साक्ष महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात केला.

पुणे - नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्यात माफीचा साक्षीदार झालेला राजेश चौधरी यानेच आरोपी आणि पुजारी यांना शेवटी एकत्रितपणे पाहिले होते. त्यामुळे त्याची साक्ष महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात केला.

विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्यासमोर खटल्याची अंतिम सुनावणी सुरू आहे. निंबाळकर यांनी माफीचा साक्षीदार चौधरी याने दिलेल्या साक्षीवरील युक्तिवाद पूर्ण केला. योगेश राऊत, विश्‍वास कदम, महेश ठाकूर आणि चौधरी यांनी नयना पुजारी यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी चौधरी हा घटनास्थळावरून निघून गेला होता. त्यानंतर आरोपींनी पुजारी यांचा खून करून मृतदेह टाकून दिला होता. त्यामुळे आरोपी आणि बळी पडलेल्या महिलेला एकत्रित पाहणारा तो महत्त्वाचा साक्षीदारच आहे. चौधरी याने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब आणि माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली साक्ष यातील तपशील एकच आहे, याकडे निंबाळकर यांनी न्यायालयाचे पुन्हा लक्ष वेधले.

आरोपी राऊत याने चौधरी याला पुजारी यांचा खून केल्याची माहिती दिली, त्याचवेळी त्याने यापूर्वी तीन महिलांवर बलात्कार केला आणि एका महिलेचा खून केल्याची माहिती चौधरीला दिली होती. यामुळे आरोपी अशाप्रकारचे गुन्हे करण्यात सराईत आणि निर्ढावलेले असल्याचे स्पष्ट होते. आरोपींचे कृत्य हे अमानवी असून, त्यांनी केलेला गुन्हा सिद्ध करण्यासाठी चौधरी याची साक्ष महत्त्वाची आहे. त्याला पूरक पुरावेही सरकार पक्षाने सादर केले आहेत, असे निंबाळकर यांनी नमूद केले.