‘राष्ट्रवादी’त बदलाचे वारे

‘राष्ट्रवादी’त बदलाचे वारे

शहराध्यक्षांसह अन्य पदाधिकारीही बदलण्याच्या हालचाली

पिंपरी - महापालिका निवडणुकीत सत्ता गमवावी लागल्याने पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा संजीवनी देण्यासाठी संघटना पातळीवर मोठे बदल होण्याची शक्‍यता आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या जागी माजी आमदार विलास लांडे किंवा भाऊसाहेब भोईर यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार केरळ दौऱ्याहून परतल्यानंतर खांदेपालट होणार असल्याचे समजते.

सुमारे पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता होती. फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत भाजपने सत्ता खेचून घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत मरगळ आली आहे. पराभवाचा धक्का स्वत: अजित पवार यांनाही बसला आहे. त्यांनीही शहराकडे पाठ फिरवली आहे.

महापालिकेत ३६ नगरसेवक असूनही विरोधी पक्ष म्हणून ‘राष्ट्रवादी’ आपला करिष्मा दाखवू शकलेला नाही. कार्यकर्त्यांत उत्साहही नाही. 

विसंवादाचे वातावरण 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या विसंवादाचे वातावरण आहे. पक्षनेता निवडीवरूनही वाद झाला होता. त्यामुळे पक्षात एकवाक्‍यता राहिलेली नसून संघटनेकडे असेच दुर्लक्ष झाल्यास राहिलेले कार्यकर्तेही पक्षाला रामराम ठोकतील, ही शक्‍यता विचारात घेऊन अजित पवार यांनीच शहर कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते.

विलास लांडेंचे पारडे जड
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे अन्य जबाबदारी दिली जाणार आहे. त्यांच्या जागी माजी आमदार विलास लांडे किंवा भाऊसाहेब भोईर यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. मात्र, भोईर यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली गेल्याने आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना शह देण्याची ताकद असल्याने राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी लांडे यांनाच संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

प्रतीक्षा १६ मेची
पक्षातील उदासीनता दूर करण्यासाठी अजित पवार जुन्या कार्यकर्त्यांना दूर करून तरुणांच्या हाती पक्ष सोपविण्याच्या विचारात असल्याचे कळते. १६ मे रोजी अजित पवार केरळ दौऱ्यावरून परतणार आहेत. त्यानंतर पक्षाच्या शहर कार्यकारिणीत बदलाच्या हालचालींना वेग येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पक्षामध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेससह युवक संघटना, ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बदलले जाणार आहेत. शहराध्यक्ष बदलाविषयी आपणास माहिती नाही. अजित पवार हे केरळहून परत आल्यावरच काय ते समजेल.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

संघटनेतही होणार बदल
माजी महापौर योगेश बहल यांना पक्षनेतेपदाची संधी दिल्याने नाराज झालेले दत्ता साने यांच्याकडेही मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. 
सुजाता पालांडे यांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादी महिला संघटनेचे पद रिक्त असून त्या जागेवर नव्या महिला कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. हे पद नगरसेविका वैशाली काळभोर किंवा अन्य एखाद्या आक्रमक महिलेकडे जाऊ शकते. 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पद अनेक वर्षांपासून रिक्‍त आहे. नीलेश डोके यांच्यानंतर कोणाचीही नियुक्ती अद्याप झालेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्पसंख्याक सेल, ओबीसी सेलचे अध्यक्षही बदलले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com