महापालिकेतूनही कॉंग्रेस- राष्ट्रवादीला हद्दपार करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - ""केंद्र व राज्यातून ज्याप्रमाणे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला हुसकावून लावले, त्याप्रमाणे महापालिकेतूनही त्यांना हद्दपार करा,'' असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू गुरुवारी पुणेकरांना येथे केले. कधी हिंदी, तर कधी तेलगू भाषेत भाषण करीत नायडू यांनी आपल्या खास शैलीत बीटी कवडे रस्त्यावरील बहुभाषक मतदारांशी संवाद साधला. 

पुणे - ""केंद्र व राज्यातून ज्याप्रमाणे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला हुसकावून लावले, त्याप्रमाणे महापालिकेतूनही त्यांना हद्दपार करा,'' असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू गुरुवारी पुणेकरांना येथे केले. कधी हिंदी, तर कधी तेलगू भाषेत भाषण करीत नायडू यांनी आपल्या खास शैलीत बीटी कवडे रस्त्यावरील बहुभाषक मतदारांशी संवाद साधला. 

कोरेगाव पार्क- घोरपडी प्रभाग क्रमांक 21 मधील भाजप- रिपब्लिकन पक्ष युतीचे उमेदवार नवनाथ कांबळे, लता धायरकर, मंगला मंत्री आणि उमेश गायकवाड यांच्या प्रचारासाठी बीटी कवडे रस्त्यावर झालेल्या सभेत नायडू बोलत होते. नजीकच्या बालाजी मंदिरातील उत्सवाचा संदर्भ देत नायडू यांनी तेलगू भाषेत भाषणास सुरवात केल्यावर मतदारांनी गोविंदाचा गजर करीत त्यांचे स्वागत केले. नोटाबंदीचा विषय काढताना नोटाबंदी नव्हे, तर नोटा बदलीचा निर्णय आहे, हे स्पष्ट करीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट आणि आता शिवसेनाही त्याला विरोध का करीत आहे, याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे काळा पैसा होता, हे सांगताना नायडू यांनी वापरलेली हिंदी आणि तेलगू भाषेतील शैली मतदारांची दाद मिळवून गेली. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना, पुण्यातही सत्ता का हवी, हे सांगताना त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा संदर्भ दिला. त्यांनीच सांगितले होते की, एक रुपया पाठविला तर, तळातील जनतेपर्यंत 15 पैसे पोचतात. मात्र, आता सत्ता बदल झाल्यावर पाठविलेले पूर्ण पैसे महापालिकेमार्फत मतदारांसाठी खर्च व्हावेत, यासाठीच महापालिकेत भाजपची सत्ता हवी, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्याबद्दल जास्त प्रेम वाटते म्हणूनच स्मार्ट सिटीचा कार्यक्रम पुण्यात झाला. मेट्रोपण लगेचच मंजूर केली आणि जायका प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपये दिले. आगामी काळात आणखी योजना पुण्यासाठी येणार असून, त्यांची चांगली अंमलबजावणी व्हावी, यासाठी कमळाचे बटण दाबा, असे सांगितल्यावर मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

या प्रसंगी शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते. 

सभेच्या जागेवरून घडले नाट्य 
नायडू यांची नियोजित सभा बीटी कवडे रस्त्यावरील बालाजी मंदिरामागे मैदानावर होती. त्याप्रमाणे तेथे सकाळी तयारीही सुरू झाली; परंतु जागेच्या तीन मालकांपैकी एकाने आक्षेप घेतला. पोलिस, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी त्यात हस्तक्षेप केला तरी त्यातून सायंकाळपर्यंत मार्ग निघाला नाही. अखेर संयोजकांनी परिसरातील दुसऱ्या मैदानावर सभा घेतली. त्यासाठी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अवघ्या दीड तासात व्यासपीठ उभारून, वीज व ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करून सभा पार पाडली.

Web Title: NCP, Congress to eliminate municipal corporation