राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच नमवले 

राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच नमवले 

महापालिकेच्या गेल्या काही निवडणुकांमध्ये ताकदवान ठरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे, हडपसरमध्ये भारतीय जनता पक्षाने नमवले. दोन माजी महापौरांसह जुने-जाणते उमेदवारी देऊनही राष्ट्रवादी कॉंग्रेसला हडपसर गावठाण-सातववाडीमध्ये (प्रभाग क्र. 23) आपले वर्चस्व राखता आले नाही. येथील राजकीय सामना बरोबरीत काढत भाजपने दोन जागा जिंकल्या; या निमित्ताने भाजपने पूर्व भागात दमदार प्रवेश केला. 

पक्षांतर्गत हेवेदावे, पाडापाडीच्या राजकारणामुळेच प्रचारात आघाडी घेतलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला या प्रभागात अपेक्षित यश मिळाले नसल्याची चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यातून माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांना पराभव पत्करावा लागल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू आहे. मित्रपक्ष कॉंग्रेसमधील नाराजीचा फायदाही राष्ट्रवादीला करून घेता आलेला नाही. पहिल्यांदाच ताकदीनिशी लढलेल्या भाजपने प्रस्थापितांवर मात करीत, दोन जागा पदरात पाडून घेतल्या. ढिसाळ प्रचारयंत्रणेमुळे एकमेव जागा गमावण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढविली; परंतु, चारपैकी दोन गटांत शिवसेनेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत ही बाब दखल घेण्यासारखी असली तरी, एकत्रित प्रचाराअभावीच शिवसेना विजयापासून लांब राहिल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

या प्रभागातील अ गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश ससाणे, तर ब गटातून वैशाली बनकर विजयी झाल्या. "क' गटातून भाजपच्या उज्ज्वला जंगले आणि ड गटातून भाजपचे मारुती (आबा) तुपे निवडून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून क गटात राजलक्ष्मी भोसले, ड मध्ये विजय मोरे रिंगणात होते. भाजपकडून सोपान गोंधळे, शिल्पा होले या उमेदवार होत्या; तर शिवसेनेचे जयसिंग भानगिरे, विजया कापरे, शीतल शिंदे, विजय देशमुख यांनी निवडणूक लढविली. निवडणुकीआधी ससाणे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला; तर कॉंग्रेसच्या नगरसेविका कापरे शिवसेनेच्या तिकिटावर लढल्या. पक्षांतराचा शिवसेनेला फायदा झाला नाही. आघाडी आणि मैत्रीपूर्ण लढतीचा वाद तसेच कॉंग्रेसमधील गटातटाच्या राजकारणामुळे या प्रभागात कॉंग्रेसला चंद्रकांत 

मगर आणि महेंद्र बनकर हे दोनच उमेदवार मिळाले. कॉंग्रेसचे निष्ठावान प्रशांत आणि त्यांच्या पत्नी पल्लवी सुरसे यांचे तिकीट जाणीवपूर्वक कापल्याची चर्चा  असून, त्याचा कॉंग्रेसला फटका बसल्याचे पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते सांगत आहेत. 

नवी प्रभागरचना अनुकूल असल्याचा दावा करीत, राष्ट्रवादी कॉंग्रेसला चारही जागा जिंकण्याचा विश्‍वास होता; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसला थोपविण्यासाठी भाजपच्या गोटातून जोरदार हालचाली सुरवातीपासूनच सुरू होत्या. ते निकालावरून अधोरेखितही झाले. शिवसेनेकडे मते असतानाही या निवडणुकीत त्याचा फायदा करून घेता आला नाही. प्रभागातील दोन जागांवरील अपयशापेक्षा भाजपच्या यशाची धास्ती राष्ट्रवादीच्या वर्तुळात असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com