राष्ट्रवादीचा खरा कार्यकर्ता माझ्यासोबतच - अजित पवार

ajit-pawar-pimpri
ajit-pawar-pimpri

पिंपरी - ""राष्ट्रवादी कॉंग्रेसला बदनाम केल्याशिवाय संधी मिळणार नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी रडीचा डाव चालू केला आहे. भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जात आहेत. आम्ही त्याला थारा देत नाही; परंतु त्याला वेळीच ओळखले पाहिजे,'' असे परखड मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. वारे फिरले तसे काही जण गेले. परंतु राष्ट्रवादीचा हाडामासाचा कार्यकर्ता शेवटी माझ्यासोबतच आहे, त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही,'' असेही त्यांनी विरोधकांना सुनावले. शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षामार्फत काळेवाडी येथे युवक मेळावा झाला. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून पवार बोलत होते. या वेळी माजी महापौर आझम पानसरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मयूर कलाटे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""शहराचा विकास करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोणत्याही ठराविक घटकाला डोळ्यांसमोर ठेवले नाही. मात्र, झोपडपट्टीवासीयांना  त्यांची घरे देताना विरोधकांनी कोर्टबाजी केली. स्थगिती आणली. त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात आडकाठी का? याचे उत्तर विरोधक देत नाहीत. आम्ही थातूरमातूर कामे करत नाही. आम्ही वचनपूर्ती करणारे आहोत. सत्तेत येऊन अडीच वर्षे झाल्यावर त्यांनी मेट्रोचे भूमिपूजन केले. मात्र, त्याने वाहतुकीचा प्रश्‍न सुटणार नाही.'' 

शहरवासीयांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्याचा सुविधा दिल्या. विरोधकांना या सुधारणा दिसत नाहीत का? असा सवाल करून ते म्हणाले, ""आम्ही आमच्या  कामाचे मार्केटिंग केले नाही. जाहिरातबाजी केली नाही. परंतु, त्यांनी काहीही न  करता केवळ जाहिरातबाजीवर देश ताब्यात घेतला. पण, आमचे नाणे खणखणीत आहे. महिला सक्षमीकरणाचे काम केले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, मंडल आयोगाची अंमलबजावणी केली; अन्यथा आदिवासी समाजाच्या  शकुंतला धराडे, अनिता फरांदे महापौर झाल्या असत्या काय? '' 

या वेळी "आपली विकासनगरी' ही पुस्तिका प्रकाशित केली. माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, उषा साळुंके, मनसेच्या निर्मला खैरे, भाजपच्या मीनाक्षी हरडे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

काय काय? बोलले अजित पवार.... 
-""शहरातील 128 जागांवर उमेदवार देणार आहे. कोणाला थांबायला सांगितले तर पक्ष खराब ठरत नाही. मात्र, इच्छुकाला तिकीट मिळाले नाही की दुसरीकडे 
जातो. नाही तर अपक्ष लढतो. हे वागणं बरं नव्हं.'' 

- ""म्हणे.. मूर्तींमध्ये भ्रष्टाचार! जनाची नाही तर मनाची तरी ठेवा... "स्कायवॉक'मध्ये भ्रष्टाचार झाला. "इस्टिमेट' पाहा. ते पदाधिकारी नव्हे..अधिकारी तयार करतात.'' 

- ""नवीन पक्षप्रवेश दिलेल्या प्रत्येकाला सन्मान व पदे दिली जातील, त्यासाठी थोडीशी कळ काढावी लागेल; परंतु तिकिटाचा आग्रह धरू नका.'' 

-खासदार अमर साबळे यांचा नामोल्लेख टाळून पवार म्हणाले, ""आमच्या बारामतीत याला कोणी विचारत नव्हते. वॉर्डातही ओळखत नव्हते. पण, याचा रुबाब वाढला. दाढी कोरतोय. जॅकेट घालून फिरतोय. यांनी कामे कोणती केली ती सांगवीत. 

- ""शहरभर भाजप फलक लावतोय.. देशात, राज्यात आणि आता पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे सरकार...अरे...सरकारे देश आणि राज्यात असतात, पालिकेत नाही. भाजपवाले सत्तेसाठी हपापलेले आहेत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com