राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपने पारदर्शी कारभाराची हमी दिली आहे. मात्र, भाजपकडून कामकाजात होणाऱ्या चुका प्रभावीपणे मांडण्यासाठी किंवा होणारा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी अभ्यासू व फर्डा वक्‍ता असलेले योगेश बहल यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत विभागीय आयुक्‍तांकडे नोंदणीही करण्यात आली आहे. त्यामुळे बहल हेच विरोधी पक्षनेता होणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे, अजित गव्हाणे, दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम आणि डॉ. वैशाली घोडेकर यांची नावे चर्चेत होती. यापैकी काही जणांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून तशी मागणीही केली होती. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर बुधवारी (ता. 8) पवार यांनी बहल यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केले. 

बहल हे सहाव्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेता, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ही पदे भूषविली आहेत. सध्या पक्षाचे प्रवक्‍ते म्हणून काम पाहात आहेत. 

चुकीच्या कामाला विरोध करू - बहल 
पारदर्शी कारभाराबाबत बोलणं आणि करणं, यामध्ये खूप फरक असतो. आम्ही सत्तेत असताना लोकशाही पद्धतीने वागलो. विरोधकांना बोलू देत होतो. शहराच्या विकासाला आम्ही साथ देऊ; पण चुकीच्या कामांना विरोध करू. प्रसंगी आंदोलन करू, मोर्चा काढू. त्यातूनही सत्ताधाऱ्यांनी ऐकले नाही तर न्यायालयातही जाऊ. राष्ट्रवादीकडून या पदासाठी अनेक मान्यवर इच्छुक होते. मात्र, स्थानिक नेत्यांनी माझ्यावर विश्‍वास टाकला. विरोधात बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका पार पाडू.