तब्येतीचा भरवसा नाही, आताच संधी द्या!

तब्येतीचा भरवसा नाही, आताच संधी द्या!

पुणे - ‘‘प्रभागातल्या आरक्षणामुळं महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत उभी राहिले नाही, पार्टीनं दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना निवडूनही आणलं. विधानसभेला गटबाजी झाली, तरी मी पार्टीचंच काम केलं. पुढच्या निवडणुकीपर्यंत तब्येत साथ देईल याचा भरवसा नाही. पक्षावर माझी निष्ठा आहे, त्यामुळे आता मला संधी द्या,’’ अशी विनंती धायरी-वडगाव बुद्रुक (३३ क्रमांक) प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका इच्छुक महिलेने ‘दादा’ आणि ‘ताईं’कडे तिकिटासाठी केली.

‘‘तब्येतीचे कारण सांगता, मग निवडून आल्यानंतर काम कसं करणार,’’ असा आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत प्रतिप्रश्‍न विचारून ‘दादां’नीही संबंधित महिलेला बुचकळ्यात टाकले, पण तयारीनिशी आलेल्या इच्छुक महिलेने तितकेच तत्परतेने उत्तर दिले, त्या म्हणाल्या, ‘‘निवडून आल्यानंतर माझा उत्साह वाढेल, अन्‌ अधिक जोमाने काम करेल.’’ त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. एरवी दरडावून बोलणारे दादाही इच्छुकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत होते. हलका-फुलका विनोद करीत, प्रश्‍न विचारत होते. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता.  

महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ‘दादा’ अर्थात अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. त्यात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवले. पक्ष स्थापनेपासूनचे घराण्याचे कार्य; नव्या अर्थात, दांडग्या प्रभागांमधील जनसंपर्क, नातीगोती आणि प्रभागातील बेरजेचे राजकारण मांडत इच्छुक महिला प्रभागात आपणच कसे सरस आहोत, हे ‘दादा’ आणि ‘ताईं’ना पटवून देत होत्या. विशेष म्हणजे, बहुसदस्यीय प्रभागातील ‘खर्च’ झेपण्याची ताकद असल्याचे त्या सांगायला विसरल्या नाहीत. 

महिलांमधील उत्साह पाहून ‘दादां’नीही त्यांच्या खास शैलीत प्रश्‍नांची सरबत्ती केली. परिचय ऐकल्यानंतर शिक्षण, व्यवसायाबरोबरच ‘माहेर’चीही विचारपूस ते करीत होते. निवडणुकीत महिला उमेदवारांना ‘सासर’ आणि ‘माहेर’चा फायदा होऊ शकतो का? याचा अंदाजही नेतेमंडळी घेत असल्याचे जाणवले. प्रभागातील कार्यकर्त्यांची फौज घेऊन इच्छुक महिलांनी सकाळपासूनच मुलाखतीचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी गर्दी केली होती. घोषणाबाजी करीत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले.
 

पतीची काळजी घ्या! 
पतीला हृदयविकाराचा त्रास होत असल्याने रात्रीच रुग्णालयात दाखल केल्याचे एका महिलेने मुलाखतीदरम्यान सांगितले. तरीही पक्षावरील निष्ठेमुळे मुलाखतीला आल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे माझा विचार झालाच पाहिजे, असा आग्रहही त्यांनी धरला. ‘‘मुलाखत झाल्यानंतर थेट रुग्णालयात जाऊन ‘पतीं’ची काळजी घेण्याचा सल्ला दादांनी दिला. ‘‘काही गरज भासली तर मला सांगा’’ अशा शब्दांत त्यांनी महिलेला धीर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com