कचरा प्रश्नी सुप्रिया सुळेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शहरातील कचरा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलकांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः चर्चा करावी व पुणेकरांची कचरा कोंडीतून सुटका करावी अशी मागणी यावेळी सुळे यांनी केली.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे व महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी आज (रविवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत वर्षा बंगल्यावर भेटून पुण्यातील कचरा प्रश्नांवर सुमारे 30 मिनिटे चर्चा करत निवेदन दिले. 

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न चिघळला आहे. फुरसुंगी व उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास नकार दिल्याने पुण्यातील कचरा पडून आहे. या संदर्भात येथील गावकऱ्यांनी आंदोलन केले आहे. सुप्रिया सुळे यांनी नुकतीच या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. आता त्यांनी या प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शहरातील कचरा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलकांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः चर्चा करावी व पुणेकरांची कचरा कोंडीतून सुटका करावी अशी मागणी यावेळी सुळे यांनी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते पुण्यात आंदोलकांबरोबर बैठक घेणार असल्याचे, तुपे यांनी सांगितले.