पुण्यात राष्ट्रवादीत धुसफूस 

मंगेश कोळपकर  सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांमधील वाद उफाळलेला असतानाच पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिकेतील पक्षाचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांच्या प्रभागात कचरा प्रकल्पाला दिलेल्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जगताप यांनी शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांना महापालिकेत लक्ष्य केलेले असतानाच सुळे यांच्या भेटीबाबत वेगवेगळी चर्चा होत आहे. 

कचऱ्यावरून वादाची ढिणगी 
"शहरातील कचऱ्याचे ढीग बघून या शहराची लोकप्रतिनिधी म्हणून मला लाज वाटते,' असे वक्तव्य चव्हाण यांनी नुकतेच केले होते. त्यावरून दोन दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी वगळता उर्वरित सर्व म्हणजे भाजप, कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या सदस्यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या निषेधाचाही ठराव मंजूर केला आहे. 

तुम्ही काय दिवे लावले? 
सुभाष जगताप यांनी चव्हाण यांच्या बाबतीत "नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार असताना शहराच्या विकासात काय योगदान दिले? असा प्रश्‍न उपस्थित करून दत्तक घेतलेल्या सुदुंबरे गावातही चव्हाण यांनी काय दिवे लावले', असा सवाल केला होता. राष्ट्रवादीचाच नगरसेवक चव्हाण यांना आव्हान देत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. चव्हाण यांनीही सुदुंबरेमध्ये केलेल्या 50 विकास कामांची यादी प्रसिद्धी माध्यमांकडे पाठविली होती. 

सुळेंकडून जगतापांचे कौतुक! 
या वादात सुप्रिया सुळे यांनी लक्ष घालून उभयतांना कानपिचक्‍या दिल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सुळे यांनी बुधवारी सकाळी जगताप यांच्या प्रकल्पातील ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस करणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली. त्या वेळी जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. सुळे यांना हा प्रकल्प इतका आवडला की, लगेचच त्यांनी ट्‌विटरवरून या प्रकल्पाचे कौतुक केले. चव्हाण-जगताप यांचा वाद सुरू असताना, सुळे यांनी जगताप यांचे कौतुक केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित असताना त्यांचे मनोधैर्य वाढविणारी सुळे यांची भेट ठरली असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांनाच नेहमी ताकद देतात, असेही या निमित्ताने सांगितले जात आहे.