विरोधकांना खेचण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - महापालिकेतील सर्वांत ताकदवान पक्ष... भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीपासून निघालेल्या आणि गल्लीपर्यंत येऊ घातलेल्या झंझावाताला तोंड देण्याइतपत कार्यकर्त्यांची फौज... अशी प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना खेचून घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षालाही विरोधी पक्षांतील कुमकेवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

पुणे - महापालिकेतील सर्वांत ताकदवान पक्ष... भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीपासून निघालेल्या आणि गल्लीपर्यंत येऊ घातलेल्या झंझावाताला तोंड देण्याइतपत कार्यकर्त्यांची फौज... अशी प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना खेचून घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षालाही विरोधी पक्षांतील कुमकेवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात "इन्कमिंग' जोरात सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आता विरोधी पक्षांतील तगड्या उमेदवारांना जाळ्यात ओढण्याची व्यूहरचना आखली आहे. भाजप, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेतील नाराज नगरसेवक आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेण्याची मोहीम राबविली जाणार आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही विद्यमान नगरसेवकांना पक्षात घेऊन विरोधकांपुढे नवे आव्हान उभे करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा डाव आहे. त्याकरिता आमदारांसह त्या-त्या विधानसभा मतदारासंघातील निरीक्षकांवर त्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रयोग यशस्वी होण्याची शक्‍यता असल्याने या शहरातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून काही विद्यमान नगरसेवकांना पक्षात घेण्याच्या हालचाली पक्षाच्या पातळीवर प्रभावीपणे करण्यात येत असल्याचे पक्षाने नेमलेल्या एका निरीक्षकाने सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुकांच्या घेतलेल्या मुलाखतींना प्रतिसादही चांगला मिळाला होता. अनेक प्रभागांतील इच्छुकांच्या संख्येने दोन आकडी संख्या गाठली होती. निसर्ग मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची उत्साही गर्दी जमली होती. हा पक्ष गेली दहा वर्षे महापालिकेत सत्तेवर असून, त्याने कार्यकर्त्यांचे मोहोळही चांगलेच जमविले आहे. तरीही येत्या निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांमधील नगरसेवकांची मदत पक्षाला का लागावी, असा प्रश्‍न पक्षातील कार्यकर्तेच उपस्थित करत आहेत. 

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत तयारीनिशी उतरण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केली असून, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पुण्यात झालेल्या बैठकीत रणनीती ठरविण्यात आली आहे. त्यात पक्षातील गळती रोखताना विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याचा विचार सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रयोग राबविल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल, असे उत्तर पक्षातील काहींनी दिले. 

प्रत्येक मेळाव्यात शक्तिप्रदर्शन 
निवडणुकीच्या काळात पक्षाचे मेळावे आणि बैठकांची जोरदार तयारी करण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना बैठकीत दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचा पक्ष नेतृत्वाचा प्रयत्न राहणार असल्याचेही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: NCP to pull opponents raised