'एनसीपी'ला आघाडी नको; भाजपलाही युती नकोशी

'एनसीपी'ला आघाडी नको; भाजपलाही युती नकोशी

पिंपरी : युती व आघाडीचे गुऱ्हाळ सुरू असताना गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एकहाती सत्ता मिळविण्यासाठी युती नकोच्या मानसिकतेत भाजप गेल्याचे दिसून आले आहे. तर, अशीच काहीशी अवस्था या महापालिकेतील सत्ताधारी "राष्ट्रवादी'चीही (एनसीपी) झाली असून त्यांनाही निरंकुश सत्तेसाठी बुडते जहाज बनत चाललेल्या कॉंग्रेसचे लोढणे नको झाले आहे.

कुठल्याही परिस्थितीत उद्योगनगरीत सत्तापालट करण्याचा चंग भाजपने बांधलेला आहे. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "फ्री हॅन्ड'स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच सत्ताधारी एनसीपीलाही सुरुंग लावण्यात येत आहे.त्यातून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाली आहे. एनसीपीचे नगरसेवकच नव्हे,तर बडे नेतेही आल्याने पालिकेत आता आपलीच सत्ता येणार असे भाजपला वाटू लागले आहे. त्यामुळे सध्याच्या इनमिनतीन नगरसेवकांचा आकडा 100 वर जाणार असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. त्यांच्यासह पक्षाचे दोन आमदार, एक खासदार शहरात असल्याने आपली सत्ता निश्‍चित येणार असल्याने एकहाती सत्तेत येण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात जगताप आणि शिवसेनेचे शहराचे खासदार श्रीरंग बारणे यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य आहे.

दुसरीकडे भाजपचे दुसरे आमदार भोसरीचे महेश लांडगे आणि शिवसेनेचे शहराचे प्रतिनिधित्व करणारे दुसरे खासदार शिरूरचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांचाही 36 चा आकडा आहे. त्यामुळे युती न करण्याच्या मानसिकतेतच भाजपचे स्थानिक नेते आहेत. त्यात सध्या एनसीपीसह विविध पक्षांतून होत असलेल्या मोठ्या इनकमिंगमुळे ही मानसिकता आणखी बळावली आहे. निवडून येतील असे तालेवार नगरसेवक व पदाधिकारी पक्षात आल्याने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्‍यामुळे बहुमत नक्की मिळेल, असा विश्‍वास आता आल्याने भाजपला युती नकोशी झाली आहे. त्यात मागील पोटनिवडणुकीत त्यांचे शिवसेनेशी सबंध अधिक कडवट झाल्याची भर पडलेली आहे. इच्छुकांची प्रचंड संख्या आणि निम्याच जागा देण्यावर आडून बसलेली शिवसेना यामुळे 64 जागा घेऊन एकहाती सत्तेत कसे येऊ हा प्रश्‍न भाजपच्या स्थानिक नेत्यांना भेडसावतो आहे.

एनसीपीलाही नको आघाडी दुसरीकडे पालिकेतील सत्ताधारी एनसीपीने एकेकाळचा आघाडीतील आपला मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसलाच नुकतेच खिंडार पाडले आहे.त्यांचे सात नगरसेवक फोडल्याने शहर कॉंग्रेस संतप्त आहे. उरलेल्या सातपैकी आणखी राजीनामा देऊन पक्षांतराच्या तायीरीत आहेत.त्यामुळे प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यावेळी वैभव असलेल्या कॉंग्रेसची सध्या शहरात दुरवस्था झाली असून आगामी पालिका निवडणुकीत अस्तित्व टिकविण्याचे आव्हान तिच्यासमोर उभे राहिलेले आहे. त्यामुळे एनसीपीला कॉंग्रेसची गरज राहिली नसून आगामी पालिका निवडणुकीत काठावरील बहुमत मिळाले, तर शिवसेनेची मदत घेण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे एनसीपीलाही निरंकुश सत्तेसाठी कॉंग्रेसशी आघाडी नकोशी झाली आहे. मात्र,याच सत्तेचा सोपान गाठण्यासाठी वरिष्ठ पातळीवर युती व आघाडी होण्याची शक्‍यता असल्याने राजकारणात काहीही होऊ शकते, तसेच शेवटच्या क्षणापर्यंत तेथे काय होईल,याचा अंदाज येत नाही, हे अगदी खरेच आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com