ट्रॅफिक सुधारण्यासाठी असे 'धडे' द्यावेत

Traffic
Traffic

पुण्यातील बाणेर रस्त्यावर सोमवारी (17 एप्रिलला) भीषण अपघात घडला. त्यात दोनजण दगावले. अशा घटना वारंवार समोर येत राहतात. पुण्यातील वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवे, त्यामध्ये नागरिकांनी व प्रशासनाने कोणती भूमिका बजावायला हवी, याबद्दल वाचकांनी सविस्तर प्रतिक्रिया 'ई सकाळ'ला कळविल्या आहेत. त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया संकलित स्वरुपात इथे देत आहोत : 

1. अपूर्वा गाडगीळ यांनी लिहिले आहे की शहरात प्रत्येक रस्त्यावर वेगमर्यादा दर्शविणारे फलक असावेत. तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, बाणेर रस्ता यासारख्या ठिकाणी लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नलची व्यवस्था करावी. वाहतूकीचे प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासह प्रत्येक नागरिकास वाहतुक नियमांबाबत माहीती असली पाहिजे यासाठी प्रयत्न करावे.

2. वैभव गंगाल यांचे म्हणणे आहे की वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आर्थिक दंडाने जास्त फरक पडत नाही त्यामुळे त्यांना वेगळ्या प्रकारे शिक्षा करण्यात यावी. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यास त्याचे वाहन 15 ते 30 मिनिटांसाठी थांबवून ठेवण्याची शिक्षा देण्यात यावी. एक मिनिट सिग्नलवर न थांबल्याने 30 मिनिटे थांबावे लागले तर अशा वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजेल.

3. पुणे शहरातील वाहतुकीच्या समस्येवर लॉस एंजलस (कॅलिफोर्निया) येथे राहणाऱ्या गजानन दुसाणे यांनी पायाभूत सुविधांशी संबंधीत खालील उपाय सुचवले आहेत.

  • जगातील अनेक विकसित देशांमध्ये पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी सिग्नलवर पुश बटन असते. हे बटन दाबल्यानंतर पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल सुरु होतो व काही ठराविक वेळेसाठी तो सुरु असतो. यामुळे सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे शक्य होते. अशा प्रकारची पद्धती पुण्यामध्ये गरजेची आहे.
  • महामार्गांवरुन बाहेर पडण्यासाठी 'क्रॉस जंक्शन' ऐवजी वक्र पद्धतीचे रस्ते बनविण्यात यावेत. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये अशा प्रकारचे रस्ते असतात. भारतातील रस्त्यांवर या पद्धतीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी वाहतुक कोंडीसारखे प्रश्न निर्माण होतात. नगर नियोजन विभागाने बदलत्या काळानुसार रस्त्याचे डिझाइन व कामाच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. या विभागाने काही दिवस जगातील सर्वोत्तम पद्धतींवर अभ्यास करणे गरजेचे आहे.

4. अजित वाघ यांनी लिहिले आहे की बाणेर सारख्या घटनांना वाहनचालक, महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहतुक पोलिस यांच्यासह आपण सर्वजण काही प्रमाणात जबाबदार आहोत. 

  • ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाचा वापर करुन सर्व वाहनचालकांना व नविन वाहन परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. वर्षातुन एकदा किंवा दोनदा सर्वांना याप्रकारे प्रशिक्षण घेणे अनिवार्य करावे. या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्यास दंड ठोठावण्यात यावा.
  • रस्त्यावर हॉकर्समुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झालेले असतात. अशा प्रकारची अतिक्रमणे लवकरात लवकर हटवून रस्ते मोकळे करण्यात यावेत.
  • रस्त्यांवर वाहन पार्किंग करणाऱ्यास मोठा दंड ठोठावण्यात यावा.
  • वाहतुक पोलिसांना वाहतुक नियमन व नियम तोडणाऱ्यांवर कारवाई यासाठी अद्यायावत सुविधा व साधने उपलब्ध करुन देण्यात यावेत. 

5. चंद्रा थोरबोले यांनी लिहीले आहे की भारतामध्ये अपघातात क्रॅश न होणाऱ्या मजबुत वाहनांची गरज आहे. अशा प्रकारच्या वाहनांमध्ये वाहनचालक व इतर प्रवासी अपघाता दरम्यान वाचण्याची शक्यता असते.  भारतातील वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेता वाहन उत्पादकांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे व अशा प्रकारच्या वाहनांचे उत्पादन केले पाहिजे. भारत सरकारने सुद्धा वाहन उत्पादकांना याबाबतचे निर्देश द्यावेत आणि त्याचे पालन करणे त्यांना अनिवार्य करावे. दोन वाहनांचा अपघात झाल्यानंतर कुठल्या वाहनाचे किती नुकसान होईल व कोणत्या वाहनातील प्रवाशाला किती मार लागेल हे त्या वाहनाच्या डिझाईनवर अवलंबुन असते.

  • भारतातील वाहनचालक व प्रवासी स्वतःच्या सुरक्षेबद्दल तितके जागरुक नाहीत. अनेक लोक सिटबेल्ट चा वापर करत नाहीत. या लोकांना योग्य शिक्षण हाच यावरचा उपाय आहे. यासाठी शाळेपासुन सुरुवात करण्यात यावी. सुरक्षित वाहन चालविण्याबाबत व सुरक्षिततेची काळजी घेण्याबाबत नवीन अभ्यासक्रम शाळांमध्ये सुरु करण्यात यावा. वाहन चालकांनी सिटबेल्टचा वापर करावा यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.
  • कार अपघातात वाहनातील लहान मुलांच्या जिवाचा धोका संभवु नये म्हणुन काही वाहनांमध्ये बालकांसाठी विशेष प्रणाली दिलेली असते. त्याचा वापर सर्व वाहनांमध्ये करण्यात यावा.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com