अनुभवी आणि नव्या उमेदवारांमध्ये चुरस

अनुभवी आणि नव्या उमेदवारांमध्ये चुरस

पुणे - झोपडपट्टी आणि सोसायट्यांचा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक २९. बहुभाषिक मतदार असलेल्या या प्रभागात आता अनुभवी आणि नव्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. माजी नगरसेवक श्‍याम मानकर, विद्यमान नगरसेवक अशोक हरणावळ, विनायक हनमघर, विद्यमान नगरसेवक धनंजय जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव, विद्यमान नगरसेविका मनीषा घाटे यांचे दीर धीरज घाटे, विद्यमान नगसेविका स्मिता वस्ते आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष महेश लडकत अशी बडी मंडळी एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरली आहे. काँग्रेसचे बंडखोर सुधीर काळे हे ‘ड’ गटातून रिंगणात उतरले असून, नवी पेठ-पर्वती या प्रभागातील ही लढत चुरशीची झाली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख चार पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. 

झोपडपट्टी आणि सोसायट्यांचा भाग या प्रभागात येतो. विद्यमान नगरसेविका मनीषा घाटे, धनंजय जाधव, अशोक हरणावळ, विनायक हणमघर आणि स्मिता वस्ते यांचे वर्चस्व या प्रभागात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या वर्चस्वाला छेद देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मैत्रीपूर्ण लढतीला त्याचा फायदा होतो का हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. त्यात भाजप-शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याने दोन्ही काँग्रेसला त्याचा फायदा होतो का? हे पाहण्यासारखे आहे. या प्रभागात भाजपकडून उमेदवारी वाटपाचा घोळ चर्चेचा विषय ठरला. या प्रभागात भाजपने रिपाइंसाठी जागा सोडल्या होत्या. मात्र, प्रभागातील ‘अ’ अनुसूचित जाती महिला गटात रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्या पत्नी सत्यभामा साठे यांना आणि भाजपने ऐनवेळी सरस्वती शेंडगे यांनाही उमेदवारी दिली होती. त्यातून वाद निर्माण झाला. या वादाचा निकालावर काय परिणाम होतो हेही पाहण्यासारखे आहे, तर ‘अ’ गटात भाजपकडून उमेदवारी नाकारल्यामुळे ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या धनंजय जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. या गटात साठे आणि जाधव यांना काँग्रेसच्या माधुरी पाटोळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रीना शिंदे टक्कर देणार आहेत. 

‘ब’ मागासवर्ग गटात दोन विद्यमान नगरसेवक आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष हे समोरासमोर आहेत. काँग्रेसकडून किरण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक विनायक हनमघर, भाजपकडून महेश लडकत, शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक अशोक हरणावळ आणि मनसेकडून अभिमन्यू मैड यांच्यात लढत रंगणार आहे.

‘क’ महिलांच्या सर्वसाधारण गटात भाजपच्या विद्यमान नगरसेविका स्मिता वस्ते यांना काँग्रेसकडून शारदा गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगिता मेमाणे, शिवसेनेच्या प्रज्ञा काकडे आणि मनसेच्या उषा काळे या नव्या उमेदवार आवाहन देणार आहेत. 

‘ड’ गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक श्‍याम मानकर, काँग्रेसकडून विकास लांडगे, भाजपकडून धीरज घाटे आणि शिवसेनेकडून डॉ. सचिन पुणेकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे, तर मनसेच्या अक्षता लांडगे यांचेही आवाहन या गटात पाहता येईल. अनुभवी आणि नवे चेहरे अशी रंगतदार लढत या प्रभागात होणार असून, विद्यमान नगरसेवकांचे पद कायम राहते का? हा चर्चेचा विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com