पिंपरी-चिंचवडमध्ये युतीचे संकेत; जागावाटपाचा नवा फॉर्म्युला

उत्तम कुटे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

'युती झाली, तर उद्योगनगरीत युतीची सत्ता येऊ शकते, हे शिवसेनेने केलेल्या 'सर्व्हे'तूनही दिसून आल्याने त्यासाठी पक्षाने पूर्ण सकारात्मक भूमिका घेतली असून त्याअनुषंगानेच शुक्रवारी चर्चा झाली. मात्र, युतीचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेणार असून तेच याबाबत घोषणा करतील.''
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

पिंपरी : 'राष्ट्रवादी'ला सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडण्याच्या एकमेव उद्देशाने पिंपरी-चिंचवडमध्ये युती करण्याचे संकेत शिवसेनेकडून आज (ता.13) देण्यात आले. यावेळी जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला राहणार निम्या-निम्या जागा लढविण्याच्या अटीवर युती होणार असल्याचे समजते. युतीबाबत आम्ही शंभर टक्के सकारात्मक असून आता भाजपला निर्णय घ्यायचा आहे, असे सांगत त्यांनी हा चेंडू भाजपकडे टोलविला. त्यासाठी वीस जानेवारीपर्यंतची डेडलाईन शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

युतीसंदर्भात दोन्ही मित्रपक्षांची तासभर चर्चा आकुर्डीतील हॉटेलात शुक्रवारी (ता.13) झाली. भाजपच्या वतीने राज्यसभा खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी त्यात भाग घेतला.राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारामुळे शहरात सत्तांतरांचे चित्र दिसत असल्याने युतीबाबत सकारात्मक असल्याची भूमिका शिवसेनेच्या वतीने यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि श्रीरंग बारणे यांनी मांडली.

प्रभागातील पक्षाची ताकद आणि तेथे मागे झालेले मतदान यांचा विचार करून तेथे त्या त्या पक्षांचा उमेदवार देण्याचे यावेळी ठरले. कुणी किती जागा लढवायच्या यावर यावेळी प्रकर्षाने बोलणी न होता ती प्रभागनिहाय झाली. निवडून येण्याचा निकषही त्यासाठी लावण्यात आला आहे. युतीनंतर संयुक्त निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यावरही यावेळी चर्चा झाली. जिल्हा परिषदेतही सन्मानपूर्वक युती व्हावी, असे आढळराव यांनी यावेळी गितले.तर, शहरातील अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकर या प्रलंबित ज्वलंत प्रश्‍नांचा आगामी पालिका निवडणुकीत फटका बसण्याची भीती बारणे यांनी यावेळी व्यक्त केली.