नववर्षाच्या पार्टीवर इच्छुकांची कृपादृष्टी

नववर्षाच्या पार्टीवर इच्छुकांची कृपादृष्टी

पुणे - नववर्षाचे औचित्य साधत फार्म हाउसवर पार्टी, सामिष आहार, शनिवार-रविवारी आउटिंग अन्‌ सोसायट्यांच्या टेरेसवर दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या पार्ट्या यंदा अधिक रंगण्याची चिन्हे आहेत. कारण त्यावर आहे महापालिका निवडणुकीची छाया. उमेदवारी हमखास निश्‍चित झालेल्या इच्छुकांनी कार्यकर्ते-मतदारांपर्यंत पोचण्यासाठी नव्या वर्षाची पर्वणी साधण्याचे अनेक ठिकाणी नियोजन केले आहे.

महापालिका निवडणुकीतील इच्छुकांनी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न कसोशीने सुरू केले आहेत. भाजपवगळता उर्वरित राजकीय पक्षांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. नववर्षानिमित्त मतदारांना दिनदर्शिका, शुभेच्छापत्र पाठविण्याचीही इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. काही अपवाद वगळता बहुतेक विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्यामुळे त्यांनी याबाबतीत आघाडी घेतली आहे. काही इच्छुकांनी उमेदवारी निश्‍चित नसल्यामुळे पक्षाच्या नावाचा शुभेच्छा पत्रांत उल्लेख न करता केवळ स्वतःचा, पत्नीचा उल्लेख करून संपर्क अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. तसेच नववर्षाच्या शुभेच्छा पत्रकांत मकर संक्रांतीचाही उल्लेख करण्यात आला असल्याचे काही ठिकाणी आढळले.
नववर्षानिमित्त अनेक गृहरचना सोसायट्यांत स्पर्धा, विविध गुणदर्शन, स्नेहभोजन आदींचे कार्यक्रम होतात. त्यासाठी वर्गणीही काढली जाते. परंतु, यंदा बिबवेवाडी, मार्केट यार्ड, सहकारनगर, विमाननगर, हडपसर, कोथरूड, नळस्टॉप, शास्त्रीनगर, एरंडवणा; तसेच शहराचा मध्यभाग आदी परिसरात त्या-त्या भागातील इच्छुकांनी अशा पार्ट्यांसाठी "सहकार्य' करण्याचे ठरविले असल्याचे काही मतदारांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यापासून संबंधित सोसायट्यांतील रहिवाशांसाठी सामिष भोजनाची व्यवस्था करण्यातही त्यांनी मदत केली आहे. यंदाच्या वर्षी 31 डिसेंबर शनिवारी आला असून, एक जानेवारी रोजी रविवार आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत सुमारे दीड दिवस करता येणार आहे. परिणामी कार्यकर्त्यांसाठी विशेष कार्यक्रम करण्यासाठी शहर परिसरातील खेड शिवापूर, सिंहगड रस्ता, पौड, भूगाव रस्त्यावरील "फार्म हाउस' अगोदरच "हाउस फुल' झाले आहेत. सुमारे 30-40 जणांपासून 100-200 पर्यंतच्या गटाची जेवणाची "साग्रसंगीत' व्यवस्था तेथे करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी गाड्या ठरविणे, कार्यकर्ते निश्‍चित करणे आदींची तयारी सध्या सुरू आहे. कार्यक्रमांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या गटांनाही इच्छुकांकडून सहकार्य केले जात आहे. नववर्षाचे औचित्य साधून काही उमेदवारांनी सोसायट्यांत किंवा गणेश मंडळांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे यंदाचे नववर्ष शहर आणि उपनगरांतून धूमधडाक्‍यात साजरे होणार असल्याची चिन्हे सध्या दिसू लागली आहेत.

विकासकामांचेही भूमिपूजन अन्‌ उद्‌घाटन
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता 5 जानेवारीपासून केव्हाही लागू होईल, अशी सध्या चर्चा आहे. बहुतांश प्रभागांतील विकासकामांची उद्‌घाटने, भूमिपूजने अक्षरशः उरकली गेली आहेत. उर्वरित भूमिपूजनांसाठीही 1, 2, 3 जानेवारीचे मुहूर्त शोधण्यात आले आहेत. त्यासाठीही सध्या काही विद्यमान नगरसेवकांची लगबग सुरू आहे. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेच्या नगरसेवकांची आघाडी असून त्यानिमित्ताने अजित पवार, राज ठाकरे यांचेही एक जानेवारीपासून सलग कार्यक्रम शहरांत होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com