मोफत...!

khabarbat-social-media-logo
khabarbat-social-media-logo

"महाराष्ट्र केसरी'च्या यशस्वी आयोजनानंतर सध्या वारज्यातील एका पैलवानाचे विमान सोशल मीडियावर भलतंच घिरट्या घालतंय. बारा ज्योतिर्लिंग, काशी, अष्टविनायक अशा यात्रा-सहली काढणाऱ्यांना चितपट करीत या पैलवानाने मतदारांना थेट दुबईला जाण्याची "ऑफर' दिलीय. बरं हे सगळं मोफत... मोफत... आणि मोफत! मतदारसंघातील पहिल्या भाग्यवान महिलेला कुटुंबासोबत थेट दुबईला पर्यटनासाठी जाण्याची संधी दिली जाणार आहे. ही दुबई ट्रीप महिलांमध्ये चर्चेचा विषय आहे. व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि फ्लेक्‍सवरून या विमान उड्डाणाची दररोज "उड्डाणे' सुरू आहेत. यानिमित्ताने वारजेकरांना दुबईतील रस्ते, तिथल्या नागरी सुविधातरी पाहायला मिळतील. 

उपनगरांमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठी "डेव्हलपमेंट' झालीय... त्यामुळे मतदारांनाही विकासाची चव चाखता यायला हवीच की. नुसत्या बसमधील यात्रांपेक्षा विमान प्रवास हेही विकासाचेच चिन्ह नाही का! 

नोटाबंदी झाल्याने अनेकांची पंचाईत होईल असे वाटले होते; पण महापालिका निवडणूक पुणेकरांसाठी इष्टापत्तीच ठरलीय. कारण सध्या त्यांना दररोज "कॅशलेस'चा अनुभव येतोय. प्रत्येक प्रभागात इच्छुकांकडून इतक्‍या काही "मोफत' गोष्टी दिल्या जात आहेत, त्यामुळे पैसे खर्च करण्याची गरजच भासत नाही. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्ताने भोजन आणि हमखास भेटवस्तू, वाढदिवसानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमासह भोजन हे दररोज सुरूच आहे; पण याशिवाय मोफत आधार व स्मार्ट कार्ड, मोफत उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्यांसाठी मोफत दप्तर आणि टॅब, मोफत वॉटर पार्कची सहल, मोफत पॅन कार्ड, मोफत....! ही यादी बरीच लांबलचक आहे. या सर्वांची माहिती तुमच्या फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर अगदी "अपडेट'सह येते. 

आजच सातारा रस्ता परिसरातील एका इच्छुकाने त्याने काढलेल्या सहलीचा लाभ किती जणांनी घेतला याचे "अपडेट' देतानाच पुढची सहल मार्चमध्ये निघणार असून, त्यासाठीचे बुकिंग या-या मोबाईल नंबरवर करा, असा मेसेज पाठवलाय. बघा म्हणजे हे केवळ निवडणुकीसाठी चाललंय असं नाही ना... निवडणुकीनंतरचे "बुकिंग' सुरू आहे. आत्मविश्‍वास असावा तर असा नाहीतर आपण पुणेकर उगाच कोणत्याही गोष्टीबाबत शंका घेतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com