‘कॉर्पोरेट’मुळे ‘एनआयसीयू’ची निर्मिती - रितू छाब्रिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

पुणे - ‘‘गरिबांचा विचार फारसा कोणी करत नाही. विशेषतः ‘सीएसआर’च्या बाबतीत अनेकदा केवळ शासकीय नियमांचे निकष पूर्ण करण्याच्या हेतूनेच पैसे खर्च केले जातात. आर्थिक गरज नक्की कुठे आणि कुणाला आहे, याचा विचार केला जाताना दिसत नाही. हे घडू नये, या हेतूने पूर्ण विचारांती ससून रुग्णालयातील ‘एनआयसीयू’ची निर्मिती केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आले, तर किती लक्षणीय बदल घडू शकतो, याचे हे उदाहरणच म्हणता येईल,’’ अशा शब्दांत मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुणे - ‘‘गरिबांचा विचार फारसा कोणी करत नाही. विशेषतः ‘सीएसआर’च्या बाबतीत अनेकदा केवळ शासकीय नियमांचे निकष पूर्ण करण्याच्या हेतूनेच पैसे खर्च केले जातात. आर्थिक गरज नक्की कुठे आणि कुणाला आहे, याचा विचार केला जाताना दिसत नाही. हे घडू नये, या हेतूने पूर्ण विचारांती ससून रुग्णालयातील ‘एनआयसीयू’ची निर्मिती केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आले, तर किती लक्षणीय बदल घडू शकतो, याचे हे उदाहरणच म्हणता येईल,’’ अशा शब्दांत मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ससून रुग्णालयातील अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा नवजात अर्भक अतिदक्षता विभागाचे (एनआयसीयू) उद्‌घाटन रविवारी (ता. १६) होणार आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विभागांपैकी क्षमतेने सर्वांत मोठा आणि आधुनिक असा हा नवजात अर्भक अतिदक्षता विभाग असणार आहे. 

फिनोलेक्‍स प्रायव्हेट लिमिटेड व त्याच्याशी संलग्न मुकुल माधव फाउंडेशन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तसेच इतर काही कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) दिलेल्या देणगीतून हा विभाग साकारला आहे. ‘सरकारी-खासगी भागीदारी’चे (पीपीपी) एक महत्त्वाचे पाऊल ठरलेल्या या उपक्रमाविषयी छाब्रिया आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

छाब्रिया म्हणाल्या, ‘‘‘एनआयसीयू’ हे अत्यवस्थ नवजात अर्भकांवर उपचारांसाठी अत्यावश्‍यक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असण्यासोबतच बाळाच्या आईला बाळाजवळ झोपता येईल, अशी व्यवस्था तेथे असणे आवश्‍यक ठरते. हे डोक्‍यात ठेवून आम्ही ही मदत केली आहे.’’

पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री येणार
ससून रुग्णालयातील अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा नवजात अर्भक अतिदक्षता विभागाचे (एनआयसीयू) उद्‌घाटन रविवारी (ता. १६) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता होणार आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन या वेळी उपस्थित राहणार आहे.

शहरातील रुग्णालयांची परिस्थिती अधिकाधिक चांगली व्हावी आणि त्याचा फायदा रुग्णांना मिळावा, यासाठी आमचे फाउंडेशन गेली काही वर्षे काम करत आहे. याआधी आम्ही शहरातील काही खासगी रुग्णालयांत विविध प्रकारची मदत दिलेली आहे. एवढ्या मोठ्या जागेत असा काही प्रयोग करता येणे हे आमचे स्वप्न होते. आज ते पूर्ण झाले आहे. सीएसआरसंदर्भात हे महत्त्वाचे पाऊलच ठरेल, यात शंका नाही.
- रितू छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

पुण्यात लहान-लहान गावांतून अनेक रुग्ण येत असतात. खासगी रुग्णालयातील ‘एनआयसीयू’चा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असतो. हा रुग्ण पूर्णतः ससूनवर अवलंबून असतो. त्याला पूर्णतः न्याय मिळणे आवश्‍यक असल्याचे आम्हाला जाणवत होते. त्यासाठी ‘ससून’ला बळ मिळावे, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने ही मदत केली आहे. नवजात अर्भक आणि त्यांच्या मातांसाठी या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, असे आम्ही मानतो. यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने जी मदत देऊ केली, तीही खूप मोलाची आहे. कॉर्पोरेट क्षेत्राने ठरवले, तर लोकसहभागाच्या मदतीने सरकारी पायाभूत सुविधांमधील उणिवा नक्कीच दूर होऊ शकतील.
- अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

Web Title: nicu generation by corporate