ऑनलाइन प्रक्रियेने मतदानाचा टक्का वाढणार

प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी - मतदान करण्यासाठी विद्यार्थिनींची लागलेली रांग.
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी - मतदान करण्यासाठी विद्यार्थिनींची लागलेली रांग.

निगडी - सकाळ माध्यम समूहाच्या यिन उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या महाविद्यालयीन निवडणुकीला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालय आणि ताथवडे येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शुक्रवारी निवडणूकमय वातावरण होते. ऑनलाइन मतदान प्रक्रियेने मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे तेथे विद्यार्थ्यांमधील ओसंडून वाहणाऱ्या उत्साहावरून स्पष्ट दिसून येत होते.

रामकृष्ण मोरे महाविद्यालय (आकुर्डी) महाविद्यालयाने ऑनलाइन मतदानाची प्रक्रिया तयार ठेवली होती. येथे दुरंगी लढत झाली. मतदान कक्षाबाहेर विद्यार्थ्याच्या शिस्तबद्ध रांगेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

अन्य निवडणुकीप्रमाणे येथे बंदोबस्त किंवा कायद्याचा धाक नव्हता. सारे कसे स्वयंशिस्तीने पार पडत होते. मतदानाची संधी आणि आपला प्रतिनिधी आपण निवडणार याची विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्कंठा होती. ऑनलाइन प्रक्रियेने मतदानाचा वेग वाढला आणि विद्यार्थी मतदारांना रांगेत तिष्ठत थांबावे लागले नाही. प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. बी. एस. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडली. 

शाहू कॉलेजमध्ये तिरंगी लढत
प्रतिनिधी निवडून देण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. येथे रंगलेल्या तिरंगी सामन्यामुळे मतदारांमध्येही निकालाबाबत उत्सुकता जाणवली. मतदान कक्षाबाहेरील रांगेत कोणाला व का करायचे मतदान याची चर्चा रंगत होती. निवडणूक असली तरी मतदानाच्या वेळी शांतता आणि शिस्तीचे दर्शन घडले. जेएसपीएमएसचे संचालक रवी सावंत स्वतः निवडणुकीवर लक्ष ठेवून होते. ऑनलाइन प्रक्रियेचे स्वागत करीत विद्यार्थी मतदान करीत होते. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमेय चौधरी यांनी सुसूत्र पद्धतीने प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबवली.

यिनचा स्तुत्य उपक्रम सुप्त गुणांना संधी आणि टॅलेंटला वाव देणारे यिनचे व्यासपीठ आहे. व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजाभिमुख होण्याचे अनुभव यातून विद्यार्थ्यांना मिळणार. त्यामुळे आम्ही तीन वर्षे यिनशी संलग्न आहोत.
- रवी सावंत, संचालक, जेएसपीएमएस

एक उत्तम व्यासपीठ म्हणजे यिन. उत्साह वाढवून कामाचा अनुभव यातून मिळतो. विद्यार्थ्यांसाठी हा वेगळा व मार्गदर्शक अनुभव आहे. सामाजिक जाणीव जागृती आणि मोठ्या सामाजिक ध्येयापर्यंत पोचण्यासाठी यिन हे पथदर्शी आहे.
- डॉ. आर. के. जैन, प्राचार्य, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

‘सकाळ’चा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. महाविद्यालयीन निवडणुका यिनच्या माध्यमातून सुरू झाल्या, ही बाब कौतुकास्पद आहे. अशा निवडणुकांमधून नेतृत्व गुणांचा विकासाबरोबरच ही प्रक्रिया अनुभवण्यास मिळते. जबाबदारी आणि प्रश्न यांच्याकडे पाहण्याचा आणि ते सोडविण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. अशा निवडणुका व्हाव्यात. ऑनलाइन प्रक्रिया चांगलीच आहे, मात्र यापुढे मोबाईलद्वारे मतदान घेण्याचा प्रयत्न करावा.
- एम. जी. चासकर, प्राचार्य, रामकृष्ण मोरे महाविद्यालय

तंत्रज्ञानाचा वापर करीत निवडणुकीची ऑनलाइन ही सुसूत्र पद्धत भावली. यातून बिनचूक निवडणूक होणार. यापुढे बायोमॅट्रिक पद्धतीने ही निवडणूक राबवून यशस्वी केल्यास मोठ्या निवडणुकीची ती रंगीत तालीम असेल.
- डॉ. अमेय चौधरी, निवडणूक निर्णय अधिकारी

ऑनलाइन प्रक्रियेने मतदानाचा वेळ वाचला, पारदर्शकता आली. सर्व मतदारांना सामावून घेणे शक्‍य झाले. तंत्रज्ञानाने आभासी मतदानप्रक्रिया स्तुत्य आहे.
- बी. जी. लोबो, निवडणूक निर्णय अधिकारी

उमेदवार म्हणतात
भावना बिरारी - मी याकडे स्वतःला सिद्ध करण्याचे व्यासपीठ म्हणून पाहते. सामाजिक भावना जागृत ठेवणे आणि समाजातील प्रश्नांकडे डोळसपणे पहायला शिकले.

वैभव काळे - मोठ्या निवडणुकांची ही रंगीत तालीम आहे. महाराष्ट्रात काम करण्यास संधी देणारे आणि सकारात्मक विचार करायला लावणारे हे व्यासपीठ आहे.

सागर अरगडे - समाजाकडे आणि सामाजिक प्रश्नांकडे कसे पाहावे, ते कसे सोडवावेत आणि आपली कामाची पद्धत कशी असावी, यासाठी मी यिनशी जोडला गेलो. 

अक्षय बर्गे (प्रथम वर्ष एमए) - यिनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करण्यास व्यासपीठ मिळते. विद्यार्थ्यांसाठी काम करता येते. आपण स्वतःला सिद्ध करू शकतो आणि स्वतःची प्रतिमा उंचावू शकतो. यिनचा अनुभव गेली तीन वर्षे मी घेत असून मी यिनचा आता घटक झालो आहे.

अतिश आंबेकर - मला विद्यार्थ्यांशी स्वतःला जोडायचेय. त्यासाठी यिन सर्वोत्तम पर्याय आहे. व्यक्तिमत्त्वास येथे पैलू पडणार असून समाजात काम कसे करायचे याचे प्रात्यक्षिकातून शिकायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com